दिनांक १६ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला (गुटखा) घेऊन जाणारी एक इको कार श्रीगोंदा पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई दौंड-अहिल्यानगर रोडवर करण्यात आली असून, यामध्ये गुटखा आणि कार असा एकूण ३,४६,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री. किरण शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दौंड ते अहिल्यानगर जाणारे रोडवर अल्लाउद्दीन कासम सय्यद (वय-२९, रा. सोनवाडी, ता. दौंड, जि. पुणे) हा त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी इको कार (एमएच.४३.एएल.१६६४) मध्ये प्रतिबंधीत विमल पानमसाला (गुटखा) विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत आहे.

पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोना/संग्राम जाधव, पोना/ज्ञानदेव भागवत, पोकों/संदिप शिरसाठ, पोकों/गणेश साने आणि पोकों/संदिप आजबे यांनी तत्काळ कारवाई करत, दोन पंचांना सोबत घेऊन दौंड ते अहिल्यानगर हायवे रोडवर लोणीव्यंकनाथ गावचे शिवारात रेल्वे गेट नं-१२ जवळ सापळा रचला.

दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास सदर इको कार थांबवून चालक अल्लाउद्दीन सय्यद यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष कारची झडती घेतली असता, त्यामध्ये ९६,८००/- रुपये किमतीचा विमल पानमसाला (गुटखा) आणि २,५०,०००/- रुपये किमतीची इको कार, असा एकूण ३,४६,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी अल्लाउद्दीन सय्यद याने सदर गुटखा तौफीक तांबोळी (रा. दौंड, जि. पुणे) याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोकॉ/ गणेश साने यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक संजय वाघमारे आणि पोकॉ शरद गावडे हे करत आहेत.

सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा. श्री. वैभव कलबुर्मे सो, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, व मा. श्री. प्रविण लोखंडे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
स्रोत:(प्रेस नोटमधील मजकूर वापरून तयार केलेली बातमी आहे.)
