प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन २० लाखांची खंडणी मागणारी टोळी गजाआड; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई..

दिनांक १६ जानेवारी २०२६ श्रीगोंदा:

सोशल मीडियाच्या माध्यमातून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन सराईत आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फिर्यादी वैभव आसाराम खेंडके (वय २७, रा. श्रीगोंदा) यांना १ जानेवारी २०२६ पासून एका अज्ञात मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज येत होते. आरोपींनी वैभव यांचे प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

https://www.amazon.in/dp/B0F7X5FC43/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_dl_4GB9F4Z8PSH6BPDHJMCX?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=5ce3801ed6941f87b8c538a3eb39e3f9

घाबरलेल्या फिर्यादीने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र, पूर्ण रक्कम न मिळाल्याने संतापलेल्या आरोपींनी “तू आमची फसवणूक केली आहेस, आता तुला किंवा तुझ्या घरातील कोणालाही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. यानंतर वैभव खेंडके यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी संशयित मोबाईल धारक आकाश पोपट मोरे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याचे अन्य दोन साथीदार आकाश पोपट मोरे (वय २४, रा. टाकळी लोणार, श्रीगोंदा), बापू विठ्ठल शिंदे (वय ३१, रा. वडाळी रोड, श्रीगोंदा) आणि किरण विठ्ठल शिंदे (वय २९, रा. वडाळी रोड, श्रीगोंदा) निष्पन्न झाले.

https://amzn.to/3Nog7cg

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले ३ मोबाईल फोन आणि ३ चारचाकी वाहने, असा एकूण ५४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी आणि वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किरण शिंदे, गहिनीनाथ यादव, महादेव कोहक, अरुण पवार, सचिन वारे, विवेक दळवी, मयुर तोरडमल तसेच सायबर सेलच्या राहुल गुंडू व नितीन शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading