श्रीगोंदा | दि. २६ जानेवारी २०२६:
आज संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, श्रीगोंदा तहसील कार्यालयात मात्र एका गंभीर प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कार्यक्रमाच्या ठिकाणी न लावल्याने उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
श्रीगोंदा तालुक्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र असलेल्या तहसील कार्यालयात दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरिक, विविध विभागांचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मात्र, ज्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीनिमित्त हा उत्सव साजरा केला जातो, त्या घटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा मंचावर किंवा अभिवादनासाठी ठेवण्यात आली नव्हती.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि जबाबदार अधिकारी म्हणून तहसीलदार यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

“प्रजासत्ताक दिन हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला समर्पित केलेल्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीचा दिवस आहे. याच दिवशीच त्यांचे विस्मरण होणे हा केवळ निष्काळजीपणा नसून वैचारिक उदासीनता आहे,”
महसूल विभागाचा मुख्य अधिकारी म्हणून तहसीलदार यांनी प्रोटोकॉल पाळणे आवश्यक होते, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने ही चूक केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रतिमा नसल्याचे पाहून अनेक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांचा निषेध नोंदवला आहे.
या गंभीर चुकीबद्दल तहसीलदार माफी मागणार की प्रशासन काय स्पष्टीकरण देणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“ज्या संविधानामुळे आपण आज लोकशाहीत श्वास घेत आहोत, त्या संविधानाच्या जनकाचाच विसर पडणे हे दुर्दैवी आहे. याला पूर्णतः तहसीलदार जबाबदार आहेत.”
— नागरिक.. श्रीगोंदा..
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
