दिनांक २६ जानेवारी २०२६, श्रीगोंदा/नागपूर:
दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील कामासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकचा मोठा फटका अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बसला. शनिवारी रात्री ही गाडी श्रीगोंदा स्थानकाजवळ तब्बल साडेचार तास एकाच ठिकाणी उभी राहिल्याने प्रवासी, विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले.
गाडी क्रमांक २६१०२ वंदे भारत एक्सप्रेस शनिवारी सकाळी ९:५० वाजता अजनीहून सुटली होती. रात्री ९:५० वाजता पुणे स्थानकावर पोहोचणे अपेक्षित असताना, रात्री ८:४७ च्या सुमारास ही गाडी श्रीगोंदा परिसरात थांबवण्यात आली. तांत्रिक कामे आणि मेगाब्लॉकमुळे ही गाडी मध्यरात्री १ वाजेपर्यंत तिथेच उभी होती.

१५ ते २५ जानेवारी दरम्यान मेगाब्लॉक असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, मग वंदे भारत का रद्द केली नाही? असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे.
गाडी इतका वेळ का थांबली आहे, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती वेळेवर मिळाली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला.

अखेर साडेपाच तास उशिराने, म्हणजे पहाटे ३:२५ वाजता ही गाडी पुणे स्थानकात पोहोचली. या घटनेमुळे रेल्वेच्या नियोजनावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
