श्रीगोंदा: गोवंश तस्करीप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल.. साजन पाचपुते व आतिक कुरेशीचा समावेश..

दिनांक ९ मार्च २०२५,श्रीगोंदा (अहिल्यानगर):

कोकणगाव शिवारात गोवंश तस्करीच्या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी गोवंशाची निर्दयी तस्करी करत त्यांना अन्न-पाण्याविना दोरीने बांधून ठेवले होते. तसेच फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

दिनांक ८ मार्च २०२५ रोजी दुपारी १२:३० ते संध्याकाळी ७:३० च्या सुमारास कोकणगाव शिवारात ही घटना घडली. अक्षय राजेंद्र कांचन (वय २५, रा. महादेवनगर, उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मुस्तफा कुरेशी, इब्राहिम कुरेशी, आतिक कुरेशी (रा. श्रीगोंदा), साजन सदाशिव पाचपुते (रा. काष्टी), महेश चव्हाण, शारदा महेश चव्हाण आणि श्री. शिंदे (रा. कोकणगाव) या सात आरोपींवर गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, आरोपींनी १४ जर्सी गायी कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय आणि आवश्यक कागदपत्रांशिवाय निर्दयीपणे बांधून ठेवल्या होत्या. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचा भंग करत त्यांना कत्तलीसाठी आणण्यात आले होते. फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यास विरोध केला असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून धमक्या दिल्या. तसेच, दगडफेक करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नितीन गाडगे आणि तपासी अधिकारी पोहेकॉ दत्तात्रय शिरसाठ यांनी गुन्हा नोंदवला. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, १२६(२), ३५१(४), ३५२ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत कलम ११, ५(ए), ५(बी), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे प्र.पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ करत आहेत.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading