दिनांक ११ मे २०२६,श्रीगोंदा:
शौर्यपीठ श्रीगोंदा शहरात छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती अत्यंत देदिप्यमान आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होत आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वर्गणी न गोळा करता, केवळ ‘विनावर्गणी लोकसहभाग‘ या अभिनव संकल्पनेतून १४ व १५ मे रोजी हा सोहळा संपन्न होत आहे.
यानिमित्त शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या उत्सवात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मॅरेथॉन, सायकल स्पर्धा आणि महिलांसाठी संगीत खुर्ची., वक्तृत्व स्पर्धा, शाहिरी पोवाडा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार., तसेच शंभूराजांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित ११०० पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासोबत युवकांसाठी ‘शंभू शौर्य’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
केवळ उत्सव न साजरा करता समितीने सामाजिक भानही जपले आहे. ज्यात श्रीगोंदा येथील नागरिक संदीप बजरंग घोडके यांच्या किडनी प्रत्यारोपणासाठी समितीच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य जनजागृतीसाठी भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
साधारणपणे सार्वजनिक उत्सवांसाठी वर्गणी मागितली जाते, परंतु श्रीगोंद्यातील हा जयंती उत्सव विनावर्गणी आणि केवळ लोकसहभागातून साकारला जात असल्याने संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामाजिक संस्थांनी याकामी सौजन्य स्वरूपात सहकार्य केले आहे.
सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष राजू दादा गोरे, उपाध्यक्ष विजय डहाळे, कोअर कमिटी सदस्य बालू दादा मखरे, दिलीप लबडे, शामभाऊ जरे, दीपक मखरे, आरडे मेजर व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार परिषद)

संदीप घोडके यांना किडनी प्रत्यारोपणासाठी जयंती उत्सव समितीकडून ११०००/- रुपयांची मदत देण्यात आली..
















Leave a Reply