दिनांक ११ मे २०२६,श्रीगोंदा:
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व कसं उभं करता येतं, याचं ज्वलंत उदाहरण श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील तरुण उद्योजक राहुल आबासाहेब शिंदे यांनी घालून दिलं आहे. केवळ १० पक्ष्यांपासून सुरू केलेला ‘आराध्या प्युअर गावरान ऍग्रो फार्म’चा प्रवास आज २०,००० पक्ष्यांच्या टप्प्यावर पोहोचला असून, त्यांच्या या यशाची दखल घेत त्यांना मानाचा ‘उत्कर्ष उद्योजक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सन २०२२ मध्ये एका छोट्या शेडमधून सुरू झालेला हा व्यवसाय आज महाराष्ट्रातील कुकुटपालन क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव बनला आहे. अत्यंत कमी कालावधीत राहुल शिंदे यांनी व्यवसायाचा विस्तार करत पुणे, जालना, उस्मानाबाद, सोलापूर, अहिल्यानगर आणि सातारा अशा विविध जिल्ह्यांत कंपनीच्या २५ शाखा यशस्वीपणे कार्यान्वित केल्या आहेत.

‘आराध्या प्युअर गावरान ऍग्रो फार्म’च्या माध्यमातून प्युअर गावरान अंडी, पिल्ले आणि मोठ्या पक्ष्यांची विक्री केली जाते. केवळ स्वतःचा नफा न पाहता, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शाश्वत आणि विश्वासार्ह मार्केट उपलब्ध करून देणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
याच साखळीचा एक भाग म्हणून पुणे येथे कंपनीचे नवीन भव्य शॉप सुरू होत आहे, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी होणार आहे.

“शेतकऱ्यांचा विकास, स्वावलंबी भारताचा विश्वास” हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या या संस्थेमार्फत प्युअर गावरान पोल्ट्री फार्मिंगचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही दिले जाते. यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे वळले असून त्यांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ग्रामीण भागात कुकुटपालनाचे साम्राज्य उभे करणाऱ्या राहुल शिंदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडाळी परिसरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
















Leave a Reply