दिनांक २७ मे २०२६,अहिल्यानगर:
अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रगतीशील शेतकरी व भागवत धर्माचे निष्ठावंत प्रसारक जगन्नाथ दगडुजी बोठे पाटील (वय ९०) यांचे शनिवारी (ता. २३) वाळकी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कै. जगन्नाथ बोठे पाटील यांचे पंचक्रोशीतील सामाजिक व धार्मिक कार्यात मोठे योगदान होते. ते स्वत: जुन्या काळातील म्हणजे १९६६ च्या सुमारास संगीत विशारद हा संगीत क्षेत्रातील मानाची पदवी प्राप्त केलेले वाळकी व परिसरातील एकमेव व्यक्तिमत्व होते.
संगीत कलेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या जगन्नाथ बोठे पाटील यांनी पंचक्रोशीतील हौशी तरुणांना टाळ, होर्मेनियम, तबला, पायपेटी व मृदंग वाजविण्यासह शास्त्रीय संगीत व भजनकला मोफत शिकविण्याची मोहीम पन्नास वर्षे राबविली.
संगीत क्षेत्रातील या योगदानाबद्दल त्यांना सन २०१४ मध्ये पुण्यात शनिवारवाडा पटांगणात पंडित यादवराज फड यांच्या विशेष पुढाकाराने पार पडलेल्या नवव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनात वारकरी संगीत भूषण या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले.
आपल्या आयुष्यात शेती क्षेत्रात विविध प्रयोग करत एक प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. शेतीसोबतच त्यांचा अध्यात्माकडे मोठा ओढा होता. भागवत धर्माचे पाईक म्हणून त्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा आणि भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोठे योगदान दिले.
आपल्या साध्या, सरळ आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात एक वेगळे आदरयुक्त स्थान निर्माण केले होते. वाळकी व परिसरात ते जगन्नाथतात्या या नावाने परिचित होते. राजकारणापासून ते नेहमीच जाणीवपूर्वक अलिप्त राहिले.
जगन्नाथ बोठे यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. २३) वाळकी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
त्यांच्या निधनाने वाळकी परिसरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै. जगन्नाथ बोठे हे महाष्ट्रातील वरिष्ठ पत्रकार ॲड. डॉ. बाळासाहेब बोठे पाटील, वाळकी येथील यशदीप गॅस एजन्सीचे संचालक प्रा. अनुपम बोठे पाटील आणि वीरपत्नी इंद्रायणी भालसिंग यांचे वडील होत.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
