आरोग्य – सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार – डॉ. स्वानंद सोनार
जिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठक
‘निरामय अहिल्यानगर अभियान’वर सविस्तर चर्चा

अहिल्यानगर, दि. १६ एप्रिल : जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, रुग्णालये व स्वयंसेवी संघटनांनी एकत्रितपणे कार्य केल्यास आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचू शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्यस्तरीय वैद्यकीय समन्वयक डॉ. स्वानंद अरुण सोनार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील समन्वयासाठी आयोजित मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनीही या अभियानाची माहिती जाणून घेतली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक डॉ. अजित विसपुते, राज्य समन्वयक युवराज महाजन, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे, लिपिक स्वप्नील कच्छवे, जिल्हा समन्वयक महेश सोलाट तसेच जिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था व प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. सोनार म्हणाले, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सर्व उपक्रमांना आवश्यक समन्वय व सहकार्य देण्यासाठी कटिबद्ध आहे. वैद्यकीय सेवांमधील तोतयागिरी अथवा अनुचित प्रकारांबद्दल कारवाईचे कडक निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत गेल्या वर्षभरात पुरवलेल्या सेवा, विशेष उपक्रम व वितरित निधी यासंदर्भात संक्षिप्त आढावा देण्यात आला.

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी दरमहा सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन रुग्णालयांनी करावे. त्यात सेवाभावी संस्थांनी व्यापक स्वरूपात सहभागी व्हावे. कर्करोग व मुख आरोग्य तपासणीचे प्रमाण वाढवण्यासाठी फिरत्या चिकित्सा पथकांचा वापर वाढवावा, असेही त्यांनी आवाहन केले.

जिल्ह्यातील क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या पार्श्वभूमीवर विशेष प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव दीप फाउंडेशन व विविध संस्थांच्या वतीने मांडण्यात आला. क्षयरोगग्रस्तांसाठी पोषण व आहार पुरवठ्यासाठी काही संस्था इच्छुक असल्याने नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक विक्रम पठारे यांनी हा प्रस्ताव तत्त्वतः मान्य केला. प्रशासन, रुग्णालये व स्वयंसेवी संस्थांनी मिळून वाढत्या मानसिक आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही नमूद करण्यात आले.

महिलांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण धोरण निश्चित करण्यात आले. महिला सक्षमीकरण, पोषण व आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्य समस्यांचा विचार करून त्यांच्यासाठी शुश्रूषा सेवा व निवारा केंद्रे स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात आला. या घटकांसाठी विशेष आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर सर्व प्रतिनिधींनी एकमत दर्शवले.

बैठकीदरम्यान ‘निरामय अहिल्यानगर अभियान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सादरीकरण व सविस्तर चर्चा करण्यात आली. या अभियानांतर्गत सर्वसमावेशक व आजार-प्रतिबंधक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर तज्ज्ञांनी मते व्यक्त केली. जिल्ह्याचा आरोग्य निर्देशांक उंचावण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण आरोग्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

सदर उपक्रमासाठी इंडो आयरिश हॉस्पिटल, मॅक केअर हॉस्पिटल, पंडित हॉस्पिटल, बूथ हॉस्पिटल, गरुड कॅन्सर हॉस्पिटल यांनी मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी तयारी दर्शवली. तसेच नाबार्ड, दीप फाउंडेशन, आयडियल हेल्पिंग हँड फाउंडेशन, प्रथम फाउंडेशन, कृष्णाली फाउंडेशन, सीआरएचपी फाउंडेशन, जामखेड, सीएसआरडी, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र या सामाजिक संस्थांनीही विविध स्वरूपात सेवा देण्याचा मानस व्यक्त केला.

या बैठकीबाबत ॲड. प्रियंका बोबडे-शेळके, मंदा पोळ, निर्मला केदारी, प्रदीप बांगर, राजेंद्र पवार, प्रविण साबळे, रविंद्र गायकवाड, जयेश कांबळे, हर्षल आंगळे यांनी आपापली मते मांडून समाधान व्यक्त केले व ‘निरामय अहिल्यानगर’ उपक्रम यशस्वी करण्याचा मानस व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading