वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी विनामूल्य नोंदणी मोहीम सुरूकृषी योजनांसाठी नोंदणी अनिवार्य

अहिल्यानगर, दि.१७:

वनपट्टाधारक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळावा यासाठी फार्मर आयडी नोंदणीची विशेष मोहीम राज्यभर सुरू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून नोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे सर्व पात्र वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी शारदा जाधव यांनी केले आहे.

डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अ‍ॅग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून त्यांना विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी फार्मर आयडी नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे.

वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी ही विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.

वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरिक सुविधा केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन नोंदणी करून घ्यावी. नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य व इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सुलभपणे मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading