राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथे रामोशी, बेरड, बेडर समाजाला महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन..

दिनांक २३ सप्टेंबर २०२५, श्रीगोंदा:

मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जय मल्हार क्रांती संघटना, श्रीगोंदा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राजे उमाजी नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना दौलत नाना शितोळे यांनी रामोशी समाज बांधवांना आवाहन केले की, जातीचे दाखले काढून राजे उमाजी नाईक महामंडळामार्फत उद्योगासाठी मिळणाऱ्या २ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचा लाभ घ्यावा. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, कारण त्यांच्या पुढाकारानेच रामोशी समाजासाठी महामंडळ, शासकीय जयंती, राष्ट्रीय स्मारक आणि पुरस्कार यासारख्या मागण्या पूर्ण झाल्या.

शितोळे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे श्रीगोंदा शहरात बाजार तळावर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आश्वासन दिले की, शहरात एकूण सात स्मारके तयार केली जातील, ज्यात राजे उमाजी नाईक यांचे स्मारक समाविष्ट आहे. नगरपालिकेच्या वतीने बाजार तळावर लवकरच जागा उपलब्ध करून त्याचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे पाचपुते यांनी सांगितले.

या जयंती कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शितोळे यांनी जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश पोळ आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामोशी, बेडर, बेरड समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ शहरातून सन्मान यात्रा आणि रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी पोलीस कर्मचारी अंकुश ढवळे यांनी केले.

या कार्यक्रमाला आदेश शेंडगे, अनिल ठवाळ, मुकुंद सोनटक्के, प्रशांत गोरे, अनिल गव्हाणे, साहेबराव रासकर, अरविंद कापसे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

जयंती उत्सवाचे आयोजक (अध्यक्ष) संदीप गोविंद भोईटे, (उपाध्यक्ष) अनिल जगन्नाथ ननवरे, नितीन ननवरे, संतोष ननवरे, सचिन ननवरे, चंद्रकांत ननवरे, राजेंद्र ननवरे, अंकुश ढवळे मेजर, संतोष पोळ, गणेश पोळ, सुशील खराडे, जालिंदर खराडे, शांतीलाल मदने सह समाज बांधवांनी विशेष प्रयत्न केले.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading