दिनांक १३ एप्रिल २०२५,श्रीगोंदा:
‘नागवडे’ साखर कारखान्याने कामगारांना दिलेला ‘ले-ऑफ’ निर्णय बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याची घणाघाती टीका कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते केशवराव मगर यांनी केली आहे. कारखान्याच्या सध्याच्या दुरवस्थेला अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे मनमानी कारभार, गैरव्यवस्थापन आणि वारेमाप भ्रष्टाचार कारणीभूत असून त्याची झाकपाक करण्याचा केविलवाणा प्रयत्न नागवडे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितलभैया वाबळे, माजी संचालक हरिभाऊ कुरुमकर, ॲड. बाळासाहेब काकडे, विजय कापसे, राजकुमार पाटील, अनंता पवार आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कारखान्याच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

नागवडे कारखान्याने कमी गाळपाचे कारण देत कायम व हंगामी कामगारांना तीन महिन्यांचा ‘ले-ऑफ’ जाहीर केला. हा निर्णय अन्यायकारक व मनमानी असल्याचे पत्रकात म्हटले आहे. मागील दहा वर्षांत कारखाना सात लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट गाठू शकलेला नाही. उलट, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कामगारांना जुंपल्यामुळे कारखाना पंधरा दिवस उशिरा सुरू झाला. ऊस दराची घोषणा हंगाम संपताना करण्यात आली, शिवाय पक्षपाती ऊसतोड करण्यात आली, असे आरोप पत्रकात करण्यात आले आहेत.

ले-ऑफच्या परिपत्रकात सभासद-शेतकऱ्यांनी ऊस बाहेर पाठवल्याचे कारण दिले गेले. प्रत्यक्षात नागवडे यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून ऊस तोडणीमध्ये राजकीय भेदभाव झाल्याचे नेत्यांनी सांगितले. १५/६ ची ऊस नोंद असूनही अजनूज येथील सभासदाचा ऊस हंगाम संपताना तोडला गेला आणि तोही पूर्णपणे आणण्यात आलेला नाही.
राजेंद्र नागवडे यांनी कारखाना व शिक्षण संस्थेमध्ये मनमानी करून वारेमाप उधळपट्टी केल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला. ‘काटकसर’ दाखवण्याच्या नावाखाली चार शेतकी अधिकारी, तीन लेबर ऑफिसर कमी करून अर्धा डझन सेवानिवृत्तांना अभय योजना राबवून कामावर घेतले. नियमित कर्मचाऱ्यांना मात्र घरचा रस्ता दाखवला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही जाहिरात न देता शेकडो कामगारांची बेकायदा भरती करण्यात आली. कारखान्याच्या पगारावर नागवडे यांचे कुटुंबीय व पदाधिकाऱ्यांचे लोक काम करत आहेत, हेही पत्रकात नमूद आहे. बोगस बिले काढणाऱ्या मंडळींवर कारवाई का होत नाही? अतिथीगृह एप्रिल २०१९ पासून बंद असतानाही लाखो रुपयांचा माल खरेदी होतो, याचे उत्तर नागवडेंनी सभासदांना द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

राजेंद्र नागवडे हे स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचा वारसा सांगत असले तरी त्यांच्या सत्ताधारी वृत्ती व वारेमाप खर्चामुळे त्यांनी तो अधिकार गमावला आहे. सभासदांच्या कृपेने सत्तेत असूनही कृतघ्नपणा करत असल्याचा आरोपही पत्रकात केला आहे.
कारखान्यातील गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार व मनमानी कारभाराची सहकारमंत्र्यांकडून चौकशी व्हावी, यासाठी लवकरच शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
