दिनांक ११ मार्च २०२६, श्रीगोंदा:
गेल्या १६ जानेवारी २०२६ रोजी कोकणगाव (ता. श्रीगोंदा) येथे झालेल्या भीषण हल्ल्यात भाऊसाहेब नामदेव रजपूत यांची हत्या आणि त्यांच्या मुलावर (सुरज रजपूत) झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.
घटनेला दोन महिने उलटूनही सह आरोपी मोकाट असल्याने संतप्त झालेल्या पीडित कुटुंबाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मागण्या मान्य न झाल्यास उद्या १२ मार्च २०२६ पासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सुरज भाऊसाहेब रजपूत यांनी दिला आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२६ च्या रात्री कोकणगाव येथील रजपूत यांच्या घरावर शस्त्रास्त्रधारी जमावाने हल्ला केला होता. या हल्ल्यात भाऊसाहेब रजपूत यांची हत्या करण्यात आली, तर सुरज रजपूत गंभीर जखमी झाले होते.

या प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणेकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
पीडित कुटुंबाच्या प्रमुख मागण्या आहेत की, घटनेवेळी उपस्थित असलेल्या उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
शैला चव्हाण यांच्याकडून असलेल्या जिवाच्या धोक्याची दखल घेऊन पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे.

तपासादरम्यान सोडून दिलेल्या चार संशयितांवर तात्काळ कारवाई करावी.
मुख्य आरोपी महेश चव्हाण याच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करून कट रचणे आणि दंगल घडवल्याचे गुन्हे नोंदवावेत.
तपासात हलगर्जीपणा आणि आर्थिक तडजोड केल्याचा आरोप असलेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

याबाबत जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ कार्यालयाला दिलेल्या निवेदनात सुरज रजपूत यांनी स्पष्ट केले आहे की, पोलिसांच्या उदासीनतेमुळे आणि आरोपींना मिळत असलेल्या अभयामुळे आम्हाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे.

जर प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर १२ मार्चपासून पीडित कुटुंबासह शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील. असे निवेदन देण्यात आले होते.
स्रोत:(निवेदन)
