दिनांक ११ मार्च २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहराचे आराध्य दैवत संत शेख महंमद बाबा यांच्या यात्रा उत्सवात सध्या एका खळबळजनक घटनेची चर्चा रंगत आहे.
एका शासकीय अधिकाऱ्याला त्याच्या ‘फुकट्या’ वृत्तीमुळे एका तरुणाकडून कानशिलात खावी लागल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यात्रा उत्सवामध्ये संबंधित अधिकारी एका पाळण्यात बसला होता. मात्र, पाळण्याचे पैसे देण्यावरून किंवा ‘मी अधिकारी आहे’ असा रुबाब दाखवत फुकट बसण्याच्या कारणावरून तिथे वाद झाला.

याच वादाचे पर्यवसान हातापायीत झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने संतापून थेट त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.

या घटनेची शहरात मोठी चर्चा असली, तरी संबंधित अधिकारी कोण आहे आणि तो तरुण नेमका कोण, याबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे.

अधिकाऱ्याने आपली अब्रू वाचवण्यासाठी आणि तरुणाने कायदेशीर कटकट नको म्हणून हे प्रकरण जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवल्याचे बोलले जात आहे.

“अधिकारी असूनही किरकोळ पैशांसाठी फुकटगिरी करणे चुकीचे आहे. अशा वृत्तीला त्या तरुणाने दिलेले उत्तर धाडसीच म्हणावे लागेल,” अशा प्रतिक्रिया सध्या नागरिक खासगीत व्यक्त करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहिती)
