दिनांक १२ मार्च, २०२६, श्रीगोंदा:
तालुक्यातील गाजलेल्या कोकणगाव हत्याकांड प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलीस प्रशासनाकडून तपासात दिरंगाई होत असल्याचा आणि आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप करत पीडित कुटुंबाने आज आमरण उपोषण केले.
दरम्यान, या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पीडित कुटुंब आता राज्य मागासवर्गीय आयोगाकडे (पुणे/मुंबई) दाद मागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीडित रजपूत कुटुंबाने प्रशासनासमोर मागण्यांचा पाढा वाचला. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश होता:
मुख्य आरोपी महेश चव्हाण याच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.
घटनास्थळी शैला चव्हाण हिने वापरलेले पिस्तूल अद्याप जप्त झालेले नाही, ते तातडीने जप्त करावे.

तपासाच्या नावाखाली सोडण्यात आलेले ५ आरोपी आणि मुख्य २ सह-आरोपींना तात्काळ अटक करावी.
पीडितांच्या कलम १६४ नुसार घेतल्या जाणाऱ्या जबाबावर कोणताही दबाव टाकू नये.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर ‘कलम ४’ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सह-आरोपी करावे व त्यांचे निलंबन किंवा बडतर्फी करावी.
आंदोलकांचा असा आरोप आहे की, पोलीस प्रशासन दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी मुद्दाम उलटवून देत आहे. जेणेकरून आरोपींना जामिनाचा कायदेशीर हक्क प्राप्त होईल.
पहिल्या दिवसापासून पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना पीडित कुटुंबाने व्यक्त केली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार: कोकणगाव येथील पीडिताच्या घराला पोलीस पेट्रोलिंगद्वारे संरक्षण दिले जाईल., महेश चव्हाणवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाईल.

पीडितांनी दिलेल्या जबाबानुसार आरोपींची संख्या वाढवण्यात येईल.
हे लेखी पत्र psi संजय वाघमारे व psi सचिन लिमकर यांनी आंदोलन स्थळी सुपूर्द केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, यासाठी पीडित रजपूत कुटुंब आता आक्रमक झाले आहे. “आम्ही लवकरच राज्य मागासवर्गीय आयोग, पुणे किंवा मुंबई यांना लेखी पत्र देऊन संबंधित पोलीस निरीक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत,” असे पीडित कुटुंबाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या आंदोलनावेळी राहुल चव्हाण, पँथर संजय रणसिंग, संजय साळवे, पत्रकार चंदन घोडके, मुकुंद सोनटक्के, दिपक घोडके, ॲड.ओहोळ, साहेबराव रासकर, ॲड. महेंद्र शिंदे, ॲड. विनोद उजगरे, पीडित कुटुंबातील सुरज रजपूत, शुभम रजपूत यांच्यासह पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(आंदोलन)
