श्रीगोंदा तहसीलचा कारभार रामभरोसे; ४ मे रोजी ‘हलगी बजाव’ आंदोलनाचा बहुजन समाज पार्टीचा इशारा..!

श्रीगोंदा तहसीलचा कारभार रामभरोसे; ४ मे रोजी ‘हलगी बजाव’ आंदोलनाचा बहुजन समाज पार्टीचा इशारा..

दिनाक २७ एप्रिल २०२६,श्रीगोंदा:

तालुका तहसील कार्यालयातील भोंगळ कारभार, कामांमधील दिरंगाई आणि सामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट याविरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. येत्या ४ मे २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभा कमिटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून तहसील कार्यालयातील जनतेची कामे रखडलेली आहेत.

वारस नोंद, खाते उतारा दुरुस्ती यांसारख्या साध्या कामांसाठीही शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. कार्यालयातील अनेक विभागांमध्ये अनागोंदी सुरू असून लोकांच्या फाईली गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषतः पैशासाठी कामे अडवून धरली जात असल्याची चर्चा असून, काही विशिष्ट व्यक्तींकडून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा खळबळजनक आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

केवळ तहसील कार्यालयच नव्हे, तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवलेले घरकुलांचे प्रस्तावही धूळ खात पडून आहेत. तालुक्यातील भूमिहीन लाभार्थ्यांच्या अतिक्रमित जागांची नोंदणी करून त्यांना घरकुल मिळवून देणे गरजेचे असताना, प्रशासन केवळ प्रस्ताव पाठवण्याचे कारण सांगून वेळकाढूपणा करत आहे. या उदासीन धोरणामुळे बेघर लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

रखडलेली सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत, जनतेच्या पैशावर पगार घेणाऱ्या परंतु कामात कुचराई करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास ४ मे २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर हलगी बजावून तीव्र निषेध नोंदवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आले असून, यावर सुनील ओहोळ, राम ससाने, कचरू लष्करे, पृथ्वीराज बोखारे, आकाश सुडगे, बलभीम घोडके, छबु मोरे व मच्छिंद्र बर्डे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

स्रोत:(निवेदन)

फोटो साठी AI चा वापर करण्यात आला आहे.

प्रशासनाला निवेदन देताना..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading