दिनांक २६ सप्टेंबर २०२६,श्रीगोंदा:
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या रखडलेल्या कामाला गती देऊन नवीन डिझाईन मंजूर करावे, तसेच बनकर मळा येथील नगरपरिषदेच्या ३३ गुंठे जागेवर छत्रपती संभाजी महाराज पार्क उभारण्यात यावा, या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने श्रीगोंदा नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले होते.
शनिवार दि. २६ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सोमवार दि. २८ सप्टेंबरपासून श्रीगोंदा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता.
या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा नगरपरिषदेत अधिकारी, पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
बैठकीत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्कप्रमुख इंजि. शामभाऊ जरे व तालुकाध्यक्ष शिवश्री दिलीप लबडे यांनी ठामपणे मागण्या मांडल्या. सविस्तर चर्चेनंतर संभाजी ब्रिगेडच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या.
छत्रपती संभाजी महाराज चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाचे डिझाईन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार अंतिम करण्यात आले.
स्मारकाचे काम दर्जेदार व नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी केवळ ठेकेदारावर जबाबदारी न सोपवता संबंधित सर्वांनी कामावर लक्ष ठेवून काम पूर्ण करून घेण्याचे आवाहन शिवसेना गटनेते मा. बाबुशेठ धुमाळ यांनी केले. यास उपस्थितांनी सर्वानुमते मान्यता दिली.
बनकर मळा येथील ३३ गुंठे जागेवर उभारण्यात येणाऱ्या थीम पार्कला ‘छत्रपती संभाजी महाराज पार्क’ असे नाव देण्यास बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

नगरसेवक मा. प्रशांत गोरे यांनी नगरपरिषदेच्या आगामी बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच उपनगराध्यक्षा मा. अलकाताई अनभुले यांनीही या पार्कला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी आपण आग्रही असल्याचे सांगितले.
बैठकीत मान्य करण्यात आलेल्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा मा. सुनिताताई खेतमाळीस यांनी दिली.
त्यामुळे संभाजी ब्रिगेड पक्षाने सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी नियोजित केलेले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सुमारे १५ दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. या मागणीला यश मिळाले असून श्रीगोंदा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार विविध सवलती व सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शेतकऱ्यांनी संभाजी ब्रिगेड पक्षाच्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
या बैठकीस नगराध्यक्षा मा. सुनिताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्षा मा. अलकाताई अनभुले, मुख्याधिकारी भगत मॅडम, गटनेते बाबुशेठ धुमाळ, नगरसेवक संग्राम घोडके, शहाजीभाऊ खेतमाळीस, मिराताई शिंदे, चांदणीताई खेतमाळीस, सुशीलकुमार शिंदे, ऋषिकेशजी बोरुडे, प्रशांत गोरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते संजयजी खेतमाळीस, संतोषजी इभापे, सतीशजी बोरुडे, विठ्ठल आनंदकर, माजी नगरसेवक संतोष क्षीरसागर, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, नगरपरिषद अभियंता अंबेकर उपस्थित होते.

तसेच संभाजी ब्रिगेड पक्षाचे राजेंद्र राऊत, दिलीप आबा वाळुंज, महेंद्र मिसाळ सर, प्रफुल्ल उर्फ बापू जगताप, रवींद्र महांडुळे, सद्दाम शेख, गणेश पाचपुते, पोपट दरेकर, संदीप महांडुळे यांच्यासह शिवशंभूप्रेमी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत: (संभाजी ब्रिगेड पक्ष, श्रीगोंदा)
