दिनांक २६ सप्टेंबर २०२६,श्रीगोंदा :
शहरातील एमजेएस कॉलेजसमोर मुरुम उत्खननाच्या वादातून नगरसेवकाचा समर्थक आणि आमदाराचा जवळचा कार्यकर्ता यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या खळबळजनक प्रकारामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहराच्या लगत आमदाराच्या एका जवळच्या कार्यकर्त्यामार्फत मुरुम उत्खनन सुरू होते. या उत्खननाला विरोधी गटाच्या नगरसेवकाच्या पदाधिकाऱ्याने तीव्र विरोध केला. या वादातूनच दोन्ही गट आमनेसामने आले आणि प्रकरण विकोपाला जाऊन त्यांच्यात हाणामारी झाली. दिवसाढवळ्या घडलेल्या या राड्यात दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

शहरात उत्खननाचा हा प्रकार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. इतक्या जवळ बेकायदेशीर किंवा वादाच्या भोवऱ्यातले उत्खनन सुरू असतानाही प्रशासकीय यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे दिसून येते. महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय किंवा मलिद्याशिवाय असे प्रकार कसे सुरू राहू शकतात, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनता विचारत आहे.
एकीकडे माफिया राजरोसपणे आपले उखळ पांढरे करत असताना आणि कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात असताना, दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र हतबल भूमिकेत दिसत आहे. “वाघासारखे पोलीस शेळीसारखे काम करत आहेत” अशा शब्दांत नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, यामुळेच माफियांचा हा खुला हैदोस सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
याप्रकरणी कोणतीही अधिकृत पोलीस कारवाई किंवा प्रशासकीय पावले उचलल्याचे स्पष्ट झालेले नाही. या वाढत्या मुजोरीवर प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आणि कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)

