दिनांक ८ जानेवारी, श्रीगोंदा:
पेडगाव व अजनुज नदीपात्रामध्ये सरेआम प्रशासनाच्या वरदहस्ताने वाळू तस्करी चालू असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. नवीन तहसीलदार रुजू झाल्यानंतर त्यांनी वाळू तस्करांवर चांगलाच रोख लावला. मात्र, अचानकच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून वाळूतस्करांची वळवळ सुरू झाल्याचे दिसू लागले.

तहसीलदार व पोलिस प्रशासनाच्या मदतीने वाळू तस्करी चालू असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. पूर्वी तहसील व पोलिस प्रशासनाला देण्यात येणाऱ्या हप्त्यांपेक्षा जास्त हप्ता देऊन, वाळू तस्करी चालू करण्याचा प्रयत्न या वाळू माफियांकडून करण्यात येत असल्याचेही चर्चा आहे.
याचेच दुष्पपरिणाम समोर येऊ लागले आहेत. वाळू तस्करीच्या माध्यमातून निशाचर होऊन फिरणाऱ्या या तरुणांकडून सामान्यांसह वंचितांवर होणारे अत्याचार पेडगाव रोड वरील भटक्या – विमुक्त समाजातील सावंत कुटुंबावर झालेल्या अन्याय तसेच नाना शिंदे यांच्या घरच्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने पुढे येत आहेत.
स्थानिक प्रशासनासमोर खुलेआम अशा पद्धतीने वाळू तस्करी आणि गौण खनिजाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण कायद्याला मूठमाती देऊन, गडगंज झालेले व सामान्यांच्या जीवावर उठलेल्या या वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन उदासीन का ? याबाबत अनेक जण प्रश्न उपस्थित करीत आहेत. वाळू तस्करी थांबवावी ही यामागची सर्वांची अपेक्षा असून, यावर लवकरच काही सामाजिक संघटना आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
स्रोत:(भटके विमुक्त समाजाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची तक्रार)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
