दिनांक ८ जानेवारी, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरालगत पेडगाव रोडवर असलेल्या भटके-विमुक्त समाजाच्या पालांवर काल रात्री वाळूतस्करांनी उच्छाद घालत तेथील लोकांना मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी देत, एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर, पिडीतांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आल्याचे नातेवाइकांकडून समजते आहे.

सविस्तर वृत्त असे की, ७ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता कुख्यात वाळू तस्कर बंटी कोथिंबीरे व त्याचे दोन साथीदार हे पेडगाव रोडवर थांबले असताना, बहुरूपी संतोष सावंत या इसमाने बंटी कोथिंबिरीला उसने पैसे मागितले, याचा राग अनावर होऊन, बंटी कोथिंबीरे व त्याच्या दोन साथीदारांनी बेल्टच्या साह्याने त्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. अमानवीय पद्धतीने केलेल्या मारहाणीत संतोष सावंत सह विचारना करणाऱ्या त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही गंभीर स्वरूपात दुखापत झाली आहे. मारहाण होत असताना सावंत व त्याच्या घरातील लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर आसपासचे लोक जमा झाले. हे पाहून बंटी कोथिंबीरे व त्यांच्या साथीदारांनी तिथून पळ काढला.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संतोष सावंतच्या पत्नीने याबाबत फिर्याद दिली असून, नमूद इसमांवर भादवि कलम ३५४, ३२३, ३२४, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू तस्करीच्या आड येणाऱ्यांवर हल्ला…
बंटी कोथिंबिरे या इसमाच्या वाळू तस्करीच्या आड येणाऱ्या किंवा वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यां विरोधात बंटी दडपशाहीची भूमिका वापरून, त्यांना गाठून मारहाण करण्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे. संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नानासाहेब शिंदे व त्यांच्या कुटुंबावरही जानेवारी २०१८ मध्ये नमूद वाळूमाफियाने हमला केल्याचे समजते आहे. तत्कालीन घटनेबाबत नाना शिंदे व त्यांच्या कुटुंबातील लोकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेतली, गुन्हा दाखल केला. मात्र, पोलीस स्टेशन मधून बाहेर पडतांना त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पीडित शिंदे कुटुंबीयांनी घरी न जाता, रात्र पोलीस स्टेशनमध्येच काढली होती.
स्रोत:(पोलीस ठाण्यात दाखल तक्रार व मिळालेली माहिती)
फोटो:(श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी थांबलेले पीडित)
