प्रजापिता सम्राट अशोक (भाग १९).

प्रजापिता अशोक

अशोकाने क्रोध व लोभ यावर विजय मिळवला होता . यज्ञात पशुंचा बळी दिला जात असे . त्यावर बंदी घातली . देशी व परदेशी औषधी वनस्पतींची लागवड करून औषधी वनस्पती उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. माणसांसाठी व पशुपक्ष्यांसाठी नगरात व गावात दवाखान्याची सोय केली. ठिकठिकाणी फळझाडे लावली. त्याची फळे लोकांना मिळावीत, प्रवासी, व्यापारी, धम्मप्रसारक व सामान्य लोक जेंव्हा प्रवास करतात त्यांना वाटेत पाणी मिळावे यासाठी तलाव बांधले. विहिरी खोदल्या. ठिकठिकाणी पाणपोया सुरू केल्या. प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षांची लागवड केली . हेतू हा की प्रवासी थकला भागला तर वृक्षाच्या थंड छायेत विश्रांती घेईल. त्यावेळी बरेच प्रवासी दूरदूरचा प्रवास पायी करीत असत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

पाटलीपुत्र नगरीत येणाऱ्या ३००० मैल रस्त्यावर वृक्ष लागवड केली होती. व्यापारी, प्रवासी मोठ्या नगरापासून ते छोट्या गावापर्यंत धार्मिक व संस्कृती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असत. अशोकाने त्यांना प्रोत्साहन दिले . अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेला निवारा बांधून दिला. उत्सव सण यावेळी कुस्तीचे फड भरत स्वतः अशोक हजर राहून बक्षिसे देत असे . त्याच्यासाठी वेगळे भवन बांधून दिले . स्त्रीया व पुरूष यांना समाजात सारखेच स्थान दिले होते . त्या काळी अनेक स्त्रियांनी धम्म कार्य केले हे आपणास आढळून येते. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीवर बंधारे बांधून शेतीला पाणी देण्याची सोय करून देण्यात आली . प्रजाहितदक्ष म्हणून अशोकाची ख्याती होती .

आपल्या प्रजेला तो मुलाप्रमाणे मानीत असे . त्याने कधीही कोणाचा दुजाभाव केला नाही . श्रमिकांचे मजुरीचे दर ठरवून देण्यात आले होते . राजधानी पाटलीपुत्रात येणाऱ्यांचे (आदराथित्य ) स्वागत चांगल्या प्रकारे केले जात असे . विक्री – खरेदीचे भाव ठरवून दिलेले असत. निरनिराळ्या कामासाठी समित्या नेमून कामावर लक्ष दिले जात असे. प्रत्येक समितीचा व्यवहार चोख असे . लोकांना न्याय मिळण्यासाठी निरनिराळ्या न्यायालयांची स्थापना केली . ग्रामसंस्था (ग्रामपंचायत), वरिष्ठ न्यायालय, दिवाणी कंटकशोधक (फौजदारी) ही व्यवस्था केलेली होती . सैनिकांना रोख पगार दिला जात असे. युद्धावर सैनिक मारला गेला तर त्याच्या पत्नीला किंवा मुलांना पगाराचा काही भाग दिला जात असे .

सैन्याबरोबर गुप्तहेर संघटनाही फार प्रभावी होती . या काळात शिक्षणावरही खर्च केला जाई . विद्यापीठांना अनुदान दिले जात असे . शेतकऱ्यांना मदत करून त्यांना शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी व शेतीत काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असे . चलनव्यवस्थेवरही नियंत्रण होते . त्यामुळे अशोकाचा सर्वत्र दबदबा होता . या टाकसाळावर सौवर्णिक अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असे.

प्रजेचे हित लक्षात घेऊन अनेक लोकहिताची कामे केली. बौद्ध धम्माच्या मार्गावरुन चालत असताना साम्राज्यात शांतता आणि सुव्यवस्था लाभेल यासाठी अशोकाने जिवापाड प्रयत्न करून प्रजेला सुखी करण्याचा प्रयत्न केला. तो प्रजेला प्रिय असा राजा झाला होता. एक कर्तव्यनिष्ठ, प्रजाहितदक्ष, जनकल्याणी म्हणून देवांना प्रिय अशी अशोकाची प्रतिमा झाली . जगाच्या इतिहासात महान सम्राट म्हणून अशोक ओळखला जातो. कलिंगचे युद्ध हे पहिले आणि शेवटचे . त्यानंतर अशोकाला शस्त्र हाती धरावे लागले नाही किंवा सैनिकांनाही युद्ध करावे लागले नाही . जवळ जवळ ३२ वर्षे अशोकाने राज्यकारभार सांभाळला . विशाल साम्राज्याचा सम्राट म्हणून राज्य केले .

पण अशोकाच्या विरूद्ध साधं बंडदेखील कोणी केले नाही . ही इतिहासाने नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे . जगाच्या पाठीवर असा महान प्रजाहित दक्ष लोककल्याणी राजा शोधून ही सापडणे कठिणच . न्याय , नीती , समता , बंधुता ही बौद्ध धम्माची मानव कल्याणाची सूत्रे पकडून अशोकाने राज्य केले . ही समाजाला व प्रत्येक धर्माला व मानवाला अभिमान वाटणारी गोष्ट आहे . भन्ते उपगुप्त यांच्या समवेत भिक्खूच्या वेषात त्यांनी पायी प्रवास करून अनेक पवित्र बौद्ध स्थळांचे निरीक्षण केले होते . त्यातील अनेक गोष्टींचा अभ्यास केला होता . तेव्हापासून मैत्री , करूणा , शांती या गोष्टींवर त्यांचा विश्वास बसला . त्या गोष्टी सैनिकी शक्तीपेक्षा मानवाचे जीवन जास्त सुखी बनवतात याची खात्री पटली .

यामुळे धम्मकार्यासाठी पडेल ते कष्ट , येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची हिम्मत अशोकाजवळ आली . अशोकाने बौद्ध धम्म हा आपला राजधम्म केला. त्याचप्रमाणे इतर धर्मांचा त्यांनी योग्य तो आदरही केला . सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. बौद्ध धम्माला अशोकांनी राजाश्रय दिल्यामुळे धम्माच्या कार्याला फार मोठी गती आली. आणि बौद्ध धम्माचा प्रसार फार झपाट्याने झाला. धम्मप्रसाराकरिता त्याने धम्म खात्याची निर्मिती करून त्यावर धम्म महापात्र व धम्मायुक्त या अधिका – यांची नेमणूक केली . बौद्ध भिक्खू , श्रामणेर, उपासक यांना प्रोत्साहन दिले. धम्म लोकांमध्ये रुजवा व धम्म लोकांना कळावा यासाठी त्या काळातील सामान्य माणसाला समजणाऱ्या व प्रचलित असलेल्या पाली भाषेचा उपयोग केला. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणसाला धम्म समजण्यास फार मोठी मदत झाली . आणि त्यामुळे धम्म हा मर्यादित न राहता विशाल सागरासारखा भारत व भारताबाहेर जाऊन पोहोचला .

तो मानवाच्या जगण्यातला एक उत्तम मार्ग ठरला . अशोकांनी जागोजागी बुद्धविहारे ( संघाराम ) बांधली . एक एका संघाराममध्ये एक एक हजार किंबहुना त्यापेक्षाही जास्त बौद्ध भिक्खू राहत असत . ह्या धम्म अभ्यासाच्या व प्रचाराच्या पाठशाळाच होत्या . प्रजेला काय आवश्यक आहे याची त्यांनी खात्री करून घेतली. प्रथम तथागत गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थिंचे व वस्तूंचे दहा भाग करून त्यावर दहा स्तूप बांधण्यात आले होते . त्यापैकी आठ स्तूप पाडून त्यातील अस्थींचे व वस्तूंचे ८४००० भाग करण्याचे ठरविले.

सात स्तूप पाडल्यानंतर आठवा स्तुप पाडण्यासाठी गेले असता त्याचे अप्रतिम सौदर्य पाहून तो पाडला नाही. त्यातील भिक्षापात्र, भांडी, अस्थी असेएकूण ८४००० भाग करून त्यावर स्तूप तयार करण्याची योजना तयार केली. पाटलीपुत्रामध्ये तर इंद्रगुप्त याच्या देखरेखीखाली अशोकारामचे बांधकाम चालू होते. या कामासाठी खूप पैसा लागत होता . चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधावयाचे आणि तेही काम फक्त तीन वर्षात पूर्ण करायचे म्हणजे कारागीर , मजूर , साहित्य या अनेक गोष्टीसाठी राज्यकोषांमधून भरमसाठ पैसा खर्च होत होता. त्यासाठी अनेक गोष्टींवरचा खर्च कमी केलेला होता. सैन्यकपात करून त्याचा पैसा लोककल्याणासाठीच स्तूपांच्या बांधकामासाठी खर्च करण्यात येत होता . हे सर्व पाहून महामंत्री राधागुप्त मात्र अस्वस्थ झाले. आतापर्यंत अशोकाला ते सल्ला देत होते पण आता परिस्थिती वेगळी झाली होती . विहार , चैत्यस्तूप , स्तंभलेख , गुहा , शिलालेख यांचे कामही जोरात सुरू होते . तेव्हा राधागुप्त म्हणाले , ” राजकोषाला इतका मोठा खर्च कसा पेलवेल अगोदर अशोकराम व अनेक विहारांसाठी खूपच खर्च झाला आहे . ” ” होऊ द्या . धम्मकार्यासाठी द्रव्याचा उपयोग होणं फार महत्त्वाचं आहे . माझा राज्यकोष जर इतका चिंता करण्यासारखा क्षीण असेल तर मी कसला सम्राट ? ” युद्धकरून माणसहानी, आर्थिकहानी होत असेल तर लोककल्याणासाठी हा खर्च झाला तर ही चांगलीच गोष्ट आहे. आज्ञा महाराज , मी थोडं सांगू इच्छितो . ” ” नको महामंत्री , मी आतापर्यंत सर्व ऐकत आलो आहे . आता मी जे करतो आहे ते लोककल्याणाचा मार्ग आहे असे मी मानतो . माझ्या कार्यात आपण विरोध करू नये .

” आपल्या राज्याच्या कारकिर्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम करणारा व शिल्प कोरणारा महान धम्म सम्राट या पृथ्वीतलावर आजपर्यंत तरी कोणी झाला नसेल . त्या काळातील शिलालेख , स्तंभलेख , गुहालेख काळाच्या ओधात आजही तग धरून आहेत . अशोकांनी आपल्यासाठी अमूल्य ठेवा ठेवला आहे . ते जतन करणे हे आपल्या प्रत्येकाचे काम आहे . या कामी वापरलेला दगड काळा आणि गुळगुळीत आहे . ती कला आजपर्यंत टिकून आहे . म्हणून एखादी गोष्ट सत्य आहे हे पटवून द्यायची असेल तर आपण म्हणतो ” ही काळ्या दगडावरची रेघ आहे ” . ही म्हण अशोकाच्या शीलालेखांवरून पडली असावी किंवा प्रचलित झाली असावी . अशोकाने सर्वाधिक बुद्धविहारे बिहारमध्ये बांधली . म्हणूनच त्या प्रदेशाला बिहार असे नाव पडले . वास्तुशास्त्रातील भव्यता आणि सुंदरता ही अप्रतिम आहे . त्यामुळे साम्राज्याचा सर्वांगीण विकास झाल्याचे आढळून येते.

मथुरा येथील शिलालेखात जी नावे आहेत ती खालीलप्रमाणे दुण्विक विहार , स्वर्णकार विहार , श्री विहार , चेतिय विहार , अपानक विहार , गुहा विहार , कोष्टी किया विहार , चेतक विहार , रोषिक विहार , लका टिका विहार , प्रवारिक विहार , यशाविहार व खंड विहार ही विहारे प्रमुख विहारे असावीत असे मानले जाते . सांची बौद्ध स्तूप – ही एक जगातील सुंदर कलाकृती आहे . ही आपल्या भारतभूमीची शान आहे . याची भव्यता व सुंदरता मनमोहक आहे . याच्या पायाचा व्यास १२० फूट आणि उंची ५४ फूट आहे . चारही बाजूला प्रदक्षिणा घालण्यासाठी रस्ता असून चार दिशांना भव्य कोरीवकाम केलेले द्वार आहेत . हा वास्तुशास्त्रातील उत्कृष्ट नमुना आहे . दक्षिणी दिशेच्या स्तंभावर एक लेख कोरलेला आहे . नगरद्वार स्तूप – काबूल , पेशावर यामध्ये नगरहर येथे सम्राट अशोकाने विशाल असा स्तूप निर्माण केला . त्याची उंची ३०० फूट आहे. सारनाथ स्तूप – सारनाथ येथे धमेख ( धरमेक्षा ) स्तूप आहे .

याची उंची १४३ फूट . त्याच्या पायापासून वरील टोकापर्यंत पाषाणावर नक्षीदार काम असून धमेख या स्तूपाचे खाली प्राचीन असा लघुस्तूप आहे असे मानले जाते . पिपरावा स्तूप – हा प्राचीन स्तूप असून उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील पिपरावा येथे आहे . याचा शोध श्री पेप्पी यांनी लावला. विहारे व स्तूप बनविण्यासाठी विटा व दगडांचा उपयोग केला होता . अशोकाचा काळ प्राचीन इतिहासातील बौद्ध धम्माच्या उत्कर्षाचा सुवर्णकाळ म्हणूनच गणला गेला . स्तंभावरील कला – धम्मदीप सम्राट अशोकाच्या काळातील वास्तुकला फार भरभराटीला आली होती . अशोकस्तंभ ४० फूट ते ५० फूट उंच आहे . त्याचा व्यास २ ते ७ इंचापासून चार फूट दोन इंचापर्यंत आहे . याच्या टोकावर विविध मूर्ती बसविल्या असून त्या अलंकृत केलेल्या आहेत. त्यापैकी स्तंभाची माहिती खालीलप्रमाणे १ ) लुंबिनी स्तंभावर अश्वमूर्ती २ ) रामपुखा स्तंभावर बैलाची मूर्ती ३ ) लौरिया अरराज स्तंभावर सिंहाची मूर्ती ४ ) लौरिया नांदगड दाणे वेचत असलेल्या हंसाची ५ ) संकिया स्तंभावर हत्तीची मूर्ती ६ ) सारनाथ स्तंभावर सिंह चार दिशांना पाहत असून त्याच्याखली चार अशोकचक्रे आहेत . मध्यभागी हत्ती , सिंह , अश्व , बैलाचे चित्र कोरलेले आहे . या चारही मूर्ती तथागत गौतम बुद्धासाठी संकेतसूचक आहेत . सांची स्तंभावर सिंहाच्या चार मूर्ती , राजगृह स्तंभावर हत्तीची मूर्ती आहे . देवांना प्रियदर्षी म्हणजे राजा अशोक यांच्या आज्ञेवरूनच स्तंभलेख, शिलालेख व गुहालेख लिहिले गेले असे म्हणतात . त्याने आपल्या कार्यातून देवाला प्रियदर्शी ही संज्ञा निर्विवाद सिद्ध केली आहे .

पूर्वीच्या काळी धम्मदीप सम्राट अशोकांनी हे लेख स्तंभ कोरले तेव्हा ते अर्थातच मनुष्य वस्तीत , नगराच्या व गावाच्या जवळ होते . पण पृथ्वीवरील घडामोडीत आज त्या ठिकाणी वने वाढलेली दिसतात . त्यांचा शोध घेऊन त्याचा अर्थ लावणे हे कठीण काम ज्यांनी ज्यांनी केले , सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले ते म्हणजे . जर्मन , फ्रेंच , ब्रीटिश व भारतीयांनी अनेक वर्षे अविश्रांत काम केले आहे . त्यासाठी प्रिन्सेस, सेनार्ट, बुल्लार , स्मिथ , फ्लिट , मायकेन्सन , लटडर, थॉमस, हुलटन , भांडारकर या आंतरराष्ट्रीय विद्वानांनी जे कार्य केले ते गौरवास्पद आहे. आपणा सर्वांसाठी जे काम केले त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी असले पाहिजे.

धम्मदीप सम्राट अशोकाने बौद्ध धम्मास आश्रय देऊन त्याचे रक्षण तर केलेच व त्याचा प्रसारही फारच मोठ्या प्रमाणात केला . स्तंभ , शिलालेख , गुव्हालेख हे लाकडावर न कोरता दगडावर करून कायम ज्ञानाचे भांडार आपणास उपलब्ध करून ठेवले आहे . पाटलीपुत्र येथे ६०,००० भिक्खू राहत होते . त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण जंबूदीपात भिक्खूची संख्या वाढली व धम्मप्रसारास गती मिळाली. धम्मप्रसारातून लोककल्याणाची कामे केली. विषमतेकडून समतेकडे, दुःखाकडून सुखाकडे धम्माचा मार्ग लोकजीवनाला कलाटणी देणारा उरला . त्यामुळे भिक्खू संघबद्दल लोकांच्या मनात आदराचे स्थान होते . परंतु काम करत असताना काही विखारी लोक दुष्ट हेतूंनी भिक्खूचा वेष धारण करून संघात प्रवेश करून धम्मकार्यात अडथळा निर्माण करून, अनिष्ट प्रथा त्यात घुसडण्याचा प्रयत्न करू लागले. त्यात ऐतखाऊंची संख्या वाढत गेली. पाटलीपुत्रच्या विहारामध्ये राहत असलेल्या भिक्खूमध्ये धम्मनिष्ठ भिक्खू आणि बनावट (ढोंगी) भिक्खू यामध्ये मतभेद वाढत गेले . त्यांच्यामधील भेद इतके विकोपाला गेले की, भन्ते मोघलीपुत्र तिष्य याला खूप दुःख झाले . त्यामुळे हा गोंधळ चार वर्षे चालू होता . दर पौर्णिमेला होणा – या कार्यक्रमात खंड पडला .

https://bit.ly/bspmycityshrigonda

हे काम पुन्हा सुरू होणे गरजेचे होते . यामुळे ढोंगी भिक्खूचा डाव साध्य झाला होता व धम्मकार्याला खीळ बसली होती . ही गोष्ट चांगली नव्हती.

क्रमशः
स्रोत:(श्रीनिवास भालेराव यांच्या प्रजापिता सम्राट अशोक या पुस्तकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading