श्रीगोंदा, दि. ५ जुलै २०२५ –
तब्बल २० वर्षांपासून नॉन-बेलेबल वॉरंटमधून फरार असलेला आरोपी अखेर श्रीगोंदा पोलिसांच्या सापळ्यात अडकला. आरोपी शफीक अदम अत्तार (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यास वांगदरी गावच्या शिवारात गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली.

शफीक अदम अत्तार हा मा. फौजदारी न्यायालय, श्रीगोंदा यांचेकडील संक्षिप्त फौजदारी खटला क्र. २०००२३४/१९९९ (सरकार विरुद्ध शफीक अदम अत्तार) या खटल्यात आरोपी होता. मात्र, २००५ पासून त्याने न्यायालयात सुनावणीस हजेरी लावणे थांबवले होते. पोलीसांनी अनेक वेळा दिलेल्या पत्त्यावर शोध घेतला, मात्र तो तेथून फरार असल्याचे दिसून आले.

या प्रकरणातील नॉन-बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पोलीस नाईक ज्ञानेदव भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे यांना विशेष सूचना दिल्या. त्यानुसार, दोन्ही पोलिस कर्मचारी यांनी सखोल तपास सुरू ठेवत माहिती गोळा केली. दरम्यान, पो.कॉ. मनोज साखरे यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, फरार आरोपी वांगदरी गावच्या शिवारात येणार आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वांगदरी शिवारात सापळा रचला आणि आरोपी शफीक अत्तार याला ताब्यात घेतले. सदर आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणात पुढील तजवीज पो.ना. भागवत हे करीत आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीगोंदा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पो.ना. ज्ञानेदव भागवत आणि पो.कॉ. मनोज साखरे यांच्या कुशल आणि धाडसी प्रयत्नामुळे तब्बल दोन दशकांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत आला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
