दिनांक ३ जुलै २०२५ श्रीगोंदा: –
तालुक्यातील एक प्रमुख धार्मिक स्थळ शेख महंमद महाराज देवस्थान व शाळेपासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या शहरातील एका वाईन शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात नियमभंग होत असल्याचे समोर आले आहे. या वाईन शॉपमार्फत अनधिकृत रित्या दारूची विक्री करण्यात येत असून, ती दारू तालुक्यातील छोटे-मोठे किरकोळ दुकानदार तसेच इतर अनधिकृत विक्रेत्यांना पुरवली जात आहे..
या वाईन शॉपच्या शेजारील परिसरात दारू पिण्याचे अड्डे उघडपणे सुरू असून, तेथेच बसून दारू सेवन केले जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या अड्ड्यांवर अल्पवयीन मुलांचेही उपस्थिती दिसून येते, जे अत्यंत धोकादायक बाब आहे.

📌 स्टेट एक्साईजच्या अटींचा भंग!
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप चालवण्यासाठी काही स्पष्ट नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये:
- शाळा, धार्मिक स्थळ, रुग्णालय यांच्यापासून किमान १००-२०० मीटर अंतर आवश्यक.
- फक्त परवानाधारक दुकानातच विक्री करणे बंधनकारक.
- दारूचे सेवन दुकानाच्या परिसरात किंवा बाहेर करणे सक्त वर्ज्य.
- अल्पवयीन व्यक्तींना दारू विक्री करण्यास सक्त मनाई.
- जाहिरातबाजी व सार्वजनिक ठिकाणी सेवन रोखणे हे दुकानदाराचेच उत्तरदायित्व.
परंतु या वाईन शॉपमध्ये या सर्व अटींचा सर्रास भंग होत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे.

👥 नागरिकांमध्ये संताप; प्रशासनाकडे कारवाईची मागणी
या प्रकारामुळे शाळकरी विद्यार्थी, भक्तगण आणि महिला यांच्यासाठी परिसर असुरक्षित झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. धार्मिक स्थळासमोर रोज नशेच्या अवस्थेत फिरणाऱ्या लोकांमुळे पर्यावरण दूषित होत असून महिलांना ये-जा करतानाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक, शिक्षक, व पालक वर्गाने एकत्र येऊन प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

📣 प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनधिकृत विक्रेत्यांचे फावले!
तालुक्यातील विविध किरकोळ दुकानदारांकडे दारू कशी पोहोचते, याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एका वाईन शॉपकडून परवानगी नसताना दुसऱ्या विक्रेत्यांना दारू पुरवणे हे कायद्याने गुन्हा असूनही स्थानिक प्रशासन, पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अद्याप या ठिकाणी कारवाई केली नसल्याचे दिसून येते.

📌 मागणी:
- वाईन शॉपच्या परवान्याची चौकशी व्हावी.
- अनधिकृत अड्ड्यांवर त्वरित धाड टाकून कारवाई करावी.
- अल्पवयीन मुलांपर्यंत दारू पोहोचवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
- धार्मिक व शैक्षणिक स्थळांच्या शेजारील वाईन शॉप्स हटवण्यात यावेत.

या प्रकरणात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत नागरिकांचा विरोध तीव्र होणार आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
