दिनांक २८ जुन २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील मध्यवर्ती आणि कायम वर्दळीचा भाग असलेल्या शनि चौक ते तेली गल्ली मार्गे होनराव चौक दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या एका वाईन शॉपमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाईन शॉपमुळे रस्त्यावर सतत होणारी गर्दी, वाहतुकीस अडथळा आणि वादविवादाचे प्रसंग वाढल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्यातून शहरात येणाऱ्या दारूप्रेमींनी या दुकानाजवळ दिवसभरात मोठी गर्दी केल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे. या गर्दीमुळे परिसरातील विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध नागरिकांना या रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. दुकानासमोर वाहने उभी केल्याने रस्त्यावर अडथळा निर्माण होतो आणि अनेकदा वादविवाद किंवा किरकोळ हाणामाऱ्या झाल्याचे समोर आले आहे..

स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मते, हा वाईन शॉप मुख्य रस्त्यालगत असल्यामुळे याठिकाणी असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा नशेत असलेले लोक या परिसरात गैरवर्तन करतात, त्यामुळे महिलांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर काही नागरिक प्रशासनाकडे मागणी करणार आहेत आहे की, सदर वाईन शॉप शहराच्या मुख्य रहदारीपासून दूर, ग्राहकांच्या सोयीप्रमाणे स्थलांतरित करावा. त्यामुळे परिसरातील शिस्त, सुरक्षितता आणि वाहतुकीचा प्रश्न सुटेल.

स्थानिक पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने या बाबत तात्काळ निर्णय घेऊन संबंधित दुकानधारकावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)
