श्रीगोंदा, दि. २८ जून २०२५:
श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे काल मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी एका शेतकरी कुटुंबाच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून मारहाण करत सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

फिर्यादी अलका दत्तात्रय वाघ (वय ५८) या आपल्या पतीसोबत चांडगाव येथील राहत्या घरी झोपलेल्या असताना, चार अनोळखी इसमांनी घराच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. “तुझ्या घरात काय आहे?” असे विचारून दरोडेखोरांनी फिर्यादीच्या पती दत्तात्रय वाघ यांच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाड व बांबूने घाव घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर अलका वाघ यांच्या डाव्या मांडीवर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.

दरम्यान, आरडाओरड ऐकूनही कोणी मदतीला धावले नसल्याने अरोपींनी गळ्यातील १ तोळ्याचे मणी मंगळसूत्र (किंमत सुमारे ₹५०,०००/-) आणि डाव्या कानातील अंदाजे २.५ ग्रॅमचे सोन्याचे कर्णफूल (किंमत ₹२०,०००/-) जबरदस्तीने ओढून लंपास केले. एकूण अंदाजे ₹७०,०००/- किंमतीचा मुद्देमाल आरोपींनी चोरून नेला आहे.

घटनेनंतर जखमी दाम्पत्यास तातडीने श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालय व नंतर न्यू मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांना ही माहिती पहाटे ३ वाजता मिळाली आणि लगेचच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी ७:३० वाजता डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक लॅबने देखील तपासणी केली.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम हे करत असून, अद्याप आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागात पोलिस गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलीस)
