असिस्टंट कमांडंट महेश जंजिरे यांचा ‘जिल्हा मराठा’ संस्थेतर्फे विशेष गौरव; स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत महत्त्वाची..

दिनांक २० मे २०२६, अहिल्यानगर:

“स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी चांगल्या भौतिक सुविधा किंवा मजबूत आर्थिक परिस्थितीची गरज नसते. त्यासाठी फक्त जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही त्रिसूत्रीच खरा मंत्र आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) केंद्रीय पोलीस दलात थेट असिस्टंट कमांडंट पदावर नियुक्त झालेले महेश जंजिरे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रेसिडेन्शियल हायस्कूलचे माजी विद्यार्थी महेश ईश्वर जंजिरे यांची असिस्टंट कमांडंटपदी निवड झाली आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत रुजू होत असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे आणि सचिव ॲड. विश्वासराव आठरे-पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव मुकेश मुळे, कार्यकारिणी सदस्या अरुणा काळे, महेश यांचे वडील ईश्वर जंजिरे, आई सुनीता जंजिरे, पत्नी काजल जंजिरे, प्राचार्य धनंजय म्हस्के, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर आदी उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महेश जंजिरे यांच्या यशाचे कौतुक करत, ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महेश जंजिरे म्हणाले की, अनेक विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक परिस्थिती किंवा सुविधांअभावी यश मिळणार नाही असा न्यूनगंड असतो, पण ते चुकीचे आहे. मेहनत करणाऱ्यांना स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य धनंजय म्हस्के यांनी केले.

कार्यक्रमानंतर खाकी वर्दीतील महेश जंजिरे यांना विद्यार्थी आणि पालकांनी गराडा घातला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि हस्तांदोलन केले. उत्सुक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, पद्धत आणि विषयांची निवड याबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली. जंजिरे यांनीही सोप्या भाषेत सर्वांच्या शंकांचे निरसन केले आणि भविष्यातही मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading