दिनांक १३ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा,अहमदनगर:
आगामी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल्या व नेमणुका करण्यात आल्या आहेत. केंद्रिय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, निवडणुकीच्या कामकाजाशी थेट वा अप्रत्यक्ष संबंध असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे बदल्या करण्याची प्रक्रिया जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत पूर्ण झाली आहे.
दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, व सदस्य सचिव उपस्थित होते. बैठकीत विविध पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या व नेमणुकांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भगवानराव भोसले यांची श्रीगोंदा येथून नियंत्रण कक्ष, अहमदनगर येथे बदली करण्यात आली आहे. तसेच, नियंत्रण कक्ष, अहमदनगर येथून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक पदी किरण बाजीराव शिंदे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय, पोलीस उपनिरीक्षक विश्राम रामचंद्र पवार यांची नियंत्रण कक्ष, अहमदनगर येथून बेलवंडी पोलीस स्टेशनला नेमणूक करण्यात आली आहे.
या बदल्या व नेमणुकांची प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम २२ न चे पोटकलम (२) आणि त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार, तसेच प्रशासकीय निकडीनुसार व विनंतीनुसार करण्यात आली आहे.
संपूर्ण प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या उद्देशाने पार पडली आहे. या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त आहे.
स्रोत:(आदेश, पोलीस अधिक्षक अहमदनगर, कार्यालय आस्थापना)





