दौंड शहरात ओव्हरटेकच्या वादातून चालकावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..

दिनांक ६ जुलै २०२६,दौंड (पुणे)/श्रीगोंदा:

रस्त्यावरील वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी जागा दिली नाही या कारणावरून पिकअप चालकाने आणि त्याच्या साथीदारांनी कार चालकाचा पाठलाग करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्वप्नील सारंगधर भरणे (वय 34, व्यवसाय चालक, रा. ड्रीम गार्डन सोसायटी, शिताई हाके नगर, मांजरी फार्म, हडपसर, पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सूरज सुरेश पुणेकर (रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्नील भरणे हे शनिवारी (ता. 04) वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या सासुरवाडीला त्यांचे मेहुणे आदित्य कासार यांना आणण्यासाठी कारने गेले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भरणे हे परत येत असताना दौंड जवळील सांगवी फाटा येथे आले. यावेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एका पिकअप चालक हा ओव्हरटेक करण्यासाठी पाठीमागून सतत हॉर्न वाजवत होता. मात्र, रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असल्याने स्वप्नील भरणे त्याला साईड देऊ शकले नाहीत.

काही अंतरावर ट्रॅफिक कमी झाल्यानंतर पिकअप चालकाने भरणे यांच्या कारला ओव्हरटेक करून गाडी पुढे काढली. गाडी पुढे काढल्यानंतर पिकअप चालकाने “तू मला गाडीला साईड का दिली नाही? तू पुढे कसा जातो तेच बघतो,” अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता स्वप्नील भरणे यांच्या कारचा सांगवी फाट्यापासून दौंड शहरातील मुख्य चौकापर्यंत पाठलाग केला.

कार चौकात आली असता, आरोपींनी भरणे यांची कार अडवली. आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने स्वप्नील भरणे यांच्यावर थेट हल्ला चढवला. रॉडने बेदम मारहाण करून भरणे यांना गंभीर दुखापत करण्यात आली. तसेच, हल्लेखोरांनी लोखंडी रॉड कारवर मारून कारच्या सर्व काचा फोडल्या आणि वाहनाचे मोठे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी भरणे यांच्या तक्रारीवरून आरोपी सूरज पुणेकर व त्याच्या 3 साथीदारांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार शेख करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Ai फोटोचा वापर केला आहे…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading