श्रीगोंदा तालुक्यातील आर्वी बेटाचा संपर्क तुटला, प्रशासन सतर्क..

दिनांक ६ जुलै २०२६,श्रीगोंदा:

अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे. दौंड पूल येथे आज सायंकाळी ६.०० वाजता ५२,१३७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीचे पात्र फुगले आहे. यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे ४०० एकर क्षेत्रावर पसरलेल्या आर्वी बेटाकडे जाणारा बंधाऱ्याचा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे बेटावरील नागरिकांचा मुख्य भूमीशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला आहे. सद्यस्थितीत या बेटावर १८५ लोकसंख्या वास्तव्यास आहे.

नागरिकांची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. बेटावरील नागरिकांच्या मदतीसाठी आणि आपत्कालीन वाहतुकीसाठी एक रबर बोट तैनात करण्यात आली आहे.

पूरसदृश्य परिस्थिती असली तरी बेटावरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थानिक नागरिकांच्या संपर्कात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading