पत्नीच्या सोडचिठ्ठीसाठी, जावयाचा सासऱ्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार..

दिनांक ८ सप्टेंबर,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील शनीचौक परिसरात राहणाऱ्या कैलास राऊत या ४७ वर्षीय इसमाच्या जावयाने पत्नी सोडचिठ्ठी देत नसल्याच्या कारनांवरुन सासरवाडीत येऊन, दहशत करून, सासऱ्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करीत मित्राबरोबर पसार झाल्याची घटना दिनांक ७ सप्टेंबर रोजी घडली आहे.

याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरातील शनी चौक, महंमद महाराज मंदिराजवळील रविवार पेठ येथील रहिवाशी कैलास श्रीरंग राऊत यांच्या मुलीचा विवाह तुषार किशोर काळे राहणार मोरगाव सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे याच्या बरोबर २०१८ साली झाला होता. मात्र, लग्नानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून जावई मुलीला व घरच्यांना त्रास देत असल्याचे समोर आले. याविषयी जावई सासऱ्याला फोन करून जीवे मारण्याची धमकी देत होता.

दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पीडित राऊत यांच्या पत्नीच्या मोबाईलवर जावयाने फोन करून मुलीला घेऊन जाण्यासंदर्भात व तिच्याकडून मला सोडचिट्टी पाहिजे असल्याचे सांगितले. जर, सोडचिट्टी मिळाली नाही. तर, मी तुम्हाला खल्लास करीन असा दमही दिला. त्यानंतर सात वाजेच्या सुमारास मुलीचे वडील घरी आले, तर अगोदरच जावई घरात उपस्थित होते. त्यांच्यासोबत एक मित्र आला होता. घरामध्ये जावई बोलत असताना मुलीच्या सोडचिठ्ठीच्या कारणावरून वाद चालू होता. यात सासरेबुवा समजायला गेले असता, जावयाचा पारा चढला आणि अचानक त्याने जवळ आणलेल्या धारदार शस्त्राने साररेबुवांच्या डोक्यामध्ये दोन वार करून पलायन केले.

यानंतर नमूद पीडीत कैलास राऊत यांना शेजाऱ्यांच्या मदतीने शासकीय रुग्णालय श्रीगोंदा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना तेथून दौंड येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

कैलास राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार काळे व त्याचा साथीदार मित्र यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यांमध्ये भादवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

स्रोत:(श्रीगोंदा पो.स्टे.मध्ये दाखल फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading