फकिरा..
न्हाय . पळा . वाटा रोखा . त्येस्सी जिवंत जाऊ देऊ नका ! ”
क्षणात धावपळ झाली . चांदण्यात माणसं पळत सुटली . फकिरा अधिकच चिंतातूर झाला . जन्माचा वैरी हाती येऊन गेला , हे शल्य त्याच्या काळजात सलू लागलं आणि प्रथम खोताला ठार करीन आणि मग छावणीवर हजर होईन , हा विचार त्याच्या मस्तकात मूळ धरू लागला . उशिरानं घमांडी धावत आला आणि म्हणाला ,
” देवळामागचा कडा उतरताना पडून त्ये दोघंबी मेलंत- “
” मेलं ? ” निःश्वास टाकून फकिरा म्हणाला , ” ठीक झालं , चला ! या म्हनावं वर साऱ्यास्नी ! “
” त्येची मढी आनायची का ? ” घमांडीनं विचारलं .
” नको ! ” फकिरा उद्गारला .
रात्रभर फकिरानं डोकं टेकलं नव्हतं . सकाळीच छावणीवर हजर व्हायचं , म्हणून त्यानं सारी तयारी केली होती . पहाटेच तो स्नान करून आला होता . स्वच्छ कापडे अंगावर घालून आष्टीच्या धोतरानं त्यांन कंबर बांधली होती . सावळा , मुरा , तायनू , पिरा , भिवा हेही तयार झाले होते . सावळानं शिंग उजळून लखलखीत केलं होतं . शिंग फुकीत साहेबापुढे हजर व्हायचं , असा त्यानं बेत केला होता . आपल्या बंडखोर जीवनाचा अंत समीप आला , याचं सर्वांना दुःख वाटत होतं . या लढाईत कोण हरला नि कोण जिंकला , हा प्रश्न सर्वांच्या जिभेवर नाचत होता आणि शेवटी आपण शरणागती पत्करली , हे त्यांना बोचत होतं ; परंतु कसं का असेना , आपण मानानं हजर होऊन ही लढाई संपवीत आहोत , मार खाऊन नव्हे , याचं त्यांना समाधानही वाटत होतं .
सकाळीच फकिरानं साधूला बोलावून पुढं कसं वागायचं हे समजावून सांगितलं- आम्ही हजर झाल्यानं इतरांवर करडी नजर राहणार नाही . मग हळूहळू सर्वांनी आपआपल्या घरी जायचं , असं सांगून सूर्योदयाला थोडा अवकाश असतानाच तो घोड्यावर बसला . सर्व लोक साधूसह गावापर्यंत आले . एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले . ती त्यांची शेवटची भेट होती .
पुन्हा सर्व एकाएकी फकिरा गावात आला नि विष्णुपंतांच्या वाड्यात शिरला . प्रथम पंतांच्या पायांवर डोकं ठेवून तो म्हणाला ,
” मी हाजर व्हायला निघालो . जमात जपा माझी . साधू हाय मागं- ‘
‘ पंत बोलले नाहीत . त्यांचा कंठ भरून आला होता . तेही त्याला गावाबाहेर वाटेला लावण्यासाठी निघाले .
मग फकिरा शंकरराव पाटलाकडे गेला आणि शंकररावजीनं धावत येऊन त्याला मिठी मारली .
गावात खबर पोचली , तेव्हा सारा गाव फकिराला पाहण्यासाठी धावला आणि त्याला चार पावलं वाटेला लावण्यासाठी निघाला .
पुन्हा गावाबाहेर येताच फकिरानं गावाला हात जोडून नमस्कार केला ; तेव्हा शंकरराव म्हणाला ,
” जा ! घाबरू नकं ! गाव तुला इसरनार न्हाय ! बाप सांजीरबाच्या माळाला पडला नि बेटा नेर्त्यांच्या माळाला पडला . मी नि पंत आम्ही कोल्हापूरला मागोमाग येतो . जामीन म्हणून माझं नाव सांग ! ‘
‘ हे ऐकून फकिराला दुप्पट बळ आलं . तो भर्रकन गबऱ्यावर बसला आणि सावळानं शिंग फुकलं .
सात घोडी भरधाव नेाकडं निघाली . गबऱ्या सर्वांपुढं झेपावत होता .
छावणीच्या माळाला पुन्हा शिंग वाजलं आणि सारी छावणी हादरली . सर्व लोक बाहेर येऊन पाहू लागले , तोच फकिरा जॉनसाहेबांच्या तंबूपुढं येऊन गबऱ्यावरून उतरला नि सरळ तंबूत शिरला .
फकिराला समोर पाहून साहेब विचलित झाला ; किंचित चमकून गेला नि उद्गारला ,
” कोण ? ”
“ फकिरा रानूजी मांग-
” पुढं साहेब बोलला नाही . किती तरी वेळ तो फकिराकडे पाहतच राहिला . बाहेर ‘ फकिरा आला ‘ असा गलका सुरू होता . त्या गलक्यानं साहेब भानावर आला नि म्हणाला ,
” फकिरा ? -बैस ! ”
हातातली ती तलवार टेबलावर ठेवून फकिरा म्हणाला ,
” मी हजर व्हायला आलोय . ही बाकीची मानसं – आठ ”
” आलं लक्षात ! ” साहेब हर्षभरित होऊन म्हणाला , ” हजर होऊन तू मोठं शहाणपण दाखवलं आहेस . ठीक . बैस ना ! “
” पन , साहेब ! ” फकिरा म्हणाला , ” ह्या बेगुन्हा लोकांस्नी अटक करून त्येस्नी दावनी लावून तुम्ही शानपना दावला नाय”
” मग काय करणार ? ” साहेब म्हणाला , ” जर तुम्हीच आमच्या जागी असता , तर तुम्ही काय केलं असतं ? “
” आमी ? ” फकिरा म्हणाला , ” आमी अशी तुमची पोरंबाळं दावनीला लावली नसती , तर तुमचा तानपट्टा काढून तुमास्नी घोड्यांच्या टापांखाली तुडवून मारलं असतं !
” हे ऐकून साहेब गंभीर झाला . टेबलावरची ती तलवार उचलून तिची धार पाहात त्यानं खांदे उडवले आणि विषय बदलून तो म्हणाला ,
” ही तलवार कुठं मिळाली ? “”
ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजीराजानं दिली . ” फकिरा गंभीर होऊन म्हणाला , “ ही घेऊन माझा बाप खोतासंग लढला नि मी हिला घेऊन तुमच्याशी लढलो ! “
” आणि शेवटी हरलात- ” साहेब म्हणाला आणि हसला .
बाबरखान , प्रांतसाहेब वगैरे बडे अधिकारी जॉन साहेबांच्या मागं येऊन उभे होते . दुभाषा ऐकून भाषांतर करून सांगत होता आणि साहेब रंगात येऊन बोलत होता . फकिराची करारी मुद्रा पाहून तो दिपला होता . ‘ आणि शेवटी हरला ‘ या शब्दानं फकिरा दुखावला . तो चटकन म्हणाला ,
” साहेब , तलवारीला धार नसेल , तर ती तलवार काय कामाची ? धारंवाचून तलवार नि बळावाचून बंड लटकं असतं , साहेब , माझी पाठबळ कोती पडली , म्हनूनच ही तलवार म्या तुमाला दिली ! ”
” ठीक , आता खजिन्यातील रक्कम द्या ! असं म्हणून साहेब मोठ्यानं हसला .
” परत करण्याच्या बोलीनं ती मी लुटली नाही , साहेब ! ‘ ‘ फकिरा म्हणाला .
” ठीक . परंतु थोडे तरी रुपये द्या ! ‘ साहेब म्हणाला , “ फक्त पंधरा हजार ! ”
” त्ये तुमी आमास्नी द्या ! ” सावळा म्हणाला , “ मग त्येच आमी तुमास्नी देतो- ”
” म्हणजे सत्तर हजार पूर्ण होतील नाही का ? ” साहेब सावळाकडे वळून म्हणाला , “ पंचावन्न हजारांचा दरोडा नि हे पंधरा हजार ! तू अस्वल आहेस ! –
” थोडा वेळ विचार करून साहेब दुभाषाला काही तरी बोलला आणि दुभाषी फकिराकडं वळून म्हणाला ,
‘ ‘ साहेब म्हणतात , तू म्हणे , छावणीवर हल्ला करणार होतास? ”
” खरं हाय ! ” फकिरा म्हणाला , ” पन हल्ला करायचं माझ्या नशिबात नव्हतं नि त्यो बघायचं तुमच्या नशिबात नव्हतं ! “
” ठीक . आता पुढं काय ? ‘ साहेब उद्गारला .
‘ आता बेगुन्हा लोक सोडून द्या ! “
” कबूल ! ” साहेब बाबरखानाकडे वळून म्हणाला , “ फकिरा जी जी माणसं दाखवील , ती सोडून द्या !
” बाबरखानानं गर्दन नमवून होकार दिला नि फकिरा छावणीबाहेर आला . त्याला पाहताच सर्व माळ ओरडू लागला . फकिरा धावत जाऊन राधाच्या गळ्यात पडला . दौलतीच्या पायांना त्यानं मिठी मारली . राहीला भेटला आणि नग त्यानं सरुला पोटाशी धरली . त्या पाचांच्या डोळ्यांतून कृष्णा – कोयना वाहत होत्या . राधा बोलण्यासाठी चरफडत होती ; परंतू शब्दच उमटत नव्हता .
” तू का आलास ? ‘ ‘ दौलती आसू पुशीत म्हणाला .
” नकं , नकं . ” फकिरा म्हणाला , ” म्या तुमास्नी जन्मभर दुःख दिलं . तुर्माला ह्या दावनीत बांधून म्या जगनं … ” तो पुढं बोलला नाही . राधा म्हणाली ,
” साधू कुठाय ? “
” त्यो खुशाल हाय ! ” फकिरा म्हणाला , ” आई , आबा , थोरली आई , सरू तुम्ही काळजी करू नगा . आता घरला जावा , साधू हाय . त्यो सारं बघील .
‘ राधा बोललीच नाही . ती भ्रमिष्टाप्रमाणं फकिराकडे पाहत होती . राही मानेतील कंप आवरीत डोळे टिपीत होती . दौलती बावरला होता . तोच फकिरा बाबरखानाला म्हणाला ,
” ह्या साऱ्या दावनी कापून ही समदी मानसं सोडा ! चला ! “
हे ऐकून बाबरखानानं वळून छावणीकडे पाहिलं . जॉनसाहेब उभा होता . त्यास बाबरखानानं फकिराची इच्छा सांगितली आणि साहेबानं सर्व लोकांना सोडण्याचं हुकूम दिला . क्षणात एकूण एक माणूस मुक्त झाला . दाही दिशा माणस पळत निघाली . फकिराची माणसं जागची ढळली नाहीत . राधा नि सरू डोळ्यांत प्राण आणून फकिराकडं पाहत होत्या .
“ साहेब , आता शेवटचा अर्ज ! ‘ ‘ फकिरा साहेबाकडे जाऊन म्हणाला , ” ही माझी तलवान नि ह्यो घोडा माझ्या आज्याला मिळावा . आम्ही दरवर्षी तलवार पुजतो . ‘
” ठीक आहे ! ‘ ‘ साहेब उद्गारला आणि फकिराला आनंद झाला . त्यानं ती तलवार नेऊन राधाच्या हातात दिली . पुन्हा तिचे पाय धरले आणि तो साहेबाकडे गेला .
सावळा , मुरा , तायन , हरी , भिवा , हे सर्व आपापल्या बायकापोरांना भेटून बोलत होते . त्यांची शेवटची भेट घेत होते.
सूर्य मावळीतकडे निघाला होता . उदास वातावरण माळावर नाचत होतं . दोनशे लहान – मोठी माणसं एका जागी जमून उभी होती . त्या सर्वांना फकिरा , मुरा , हरी , पिरा , तायनू यांनी हात जोडले आणि ते सर्व लोक छावणीत शिरले .
ती दोनशे माणसं गावाकडे निघाली होती . त्यांच्या अंगात चालण्याचं त्राण नव्हतं . नि त्या सर्वांचे प्राण त्या छावणी होते . क्षणोक्षणी ती सर्व लांबून वळून पाहत होती , हळहळत होती . सर्वांच्या नेत्रांतून आसू वाहत होते . आतापर्यंतची धडपड , ती झुंज , जमातीसाठी दिलेली लढाई हे सारं सारं आठवून प्रत्येक माणूस म्हणत होता ,
” त्येंनी जबर लढाई दिली ”
राहीबाईला गबऱ्यावर बसविली होती . दौलती त्याचा लगाम धरून ओढीत होता . राधा तलवार पोटाशी धरून डोळे टिपीत निघाली होती . क्षणोक्षणी परतून पाहत होती .
सरू” सूनबाई , काय बघता ? ” दौलती खिन्न स्वरात म्हणाला , “ आता बाबू परत येणार न्हाय ! ”
” नका , नका तसं म्हनू ! ” राधाच्या काळजात कख आली . ती दाटल्या आवाजात म्हणाली , “ काय पाप केलं व्हतं , म्हणून हे सारं मी बघतेय ! बाप त्या माळावर ज्येच्यासाठी पेढ्याचा पुडा कमरंत खोवून लढत मेला , तोच नेर्त्याच्या माळावर आईसाठी आपनहून मरनाच्या दाढंत शिरला . कुनाला सांगावं नवल ? “
” हे सारं आता मनाला सांगू या ! ‘ ‘ दौलती म्हणाला , “ हां , गावं मनाला नि लाभ सांगावा जनाला – चला–
‘ ” एका लवणातून वर येऊन राधा एकाएकी थांबली आणि एक जुनी आठवण जागी झाली . ती वेड्याप्रमाणे डोळे झाकून विचार करू लागली . सर्व लोक थांबून पाहू लागले .
फकिरा लहान होता . नेात छावणी पडली होती . पोरं पोरं जमून साहेब कसले आहेत , हे पाहण्यासाठी गेली होती . राधानं फकिराला सर्वत्र शोधला ; पण त्याचा पत्ता लागत नव्हता . मग ती रडू लागली . तेव्हा आत्तारानं खबर दिली , फकिरा नेर्त्याच्या माळानं गेला आहे आणि राधा नेर्त्याच्या माळाला निघाली होती . ती चालताना फकिराची फोपाट्यात उमटलेली पावलं पाहत निघाली होती . पावलं पाहत पाहत ती याच जागेवर आली आणि समोरून लहानसा फकिरा घराकडे धावत येताना तिला दिसला .
तिला अति आनंद झाला . घामानं डबडबलेला चेहरा , ती घरची ओढ , ते सारं पाहून राधाला भडभडून आलं . तिनं मटकन गुडघे टेकले आणि भर्रकन फकिरा येऊन तिला बिलगला . त्याला पोटाशी धरूनच राधा उठली . पदरानं त्याच्या पायांवरची धूळ तिनं झाडली .
त्याच जुन्या जागेवर तो प्रसंग नव्यानं आठवताच राधाचं मस्तक सुन्न झालं . सर्व शरीर बधिर होऊन ती गर्रकन वळून नेर्त्याकडे पाहू लागली . तोच लहान फकिरा , घमांडी , मुरा , बळी येताना तिला दिसले . फकिरा राधाच्या रोखानं धावत आला . राधानं मटकन गुडघे टेकले आणि हात पसरून मिठी मारली .
आणि क्षणात राधा भानावर आली . तिच्या मिठीत फकिराची तलवार होती . सरूनं तिला उठवली . मग ती अगतिक झाली . तिनं आपली नजर दूर फेकली आणि मोठा हंबरडा फोडला , ” फकिराऽऽ ! “
क्रमशः
स्रोत:(अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीतुन)
आज फकिरा कादंबरीचा शेवटचा भाग संपन्न झाला. वाचकांनी या पुस्तकाला चांगली पसंती दिली. त्याबद्दल आभार.. कादंबरी चे सर्व भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा.
