मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ. राजेंद्र भारुड (IAS),भाग ६१.

… आणि मी आय.ए.एस. झालो

मे महिन्यात लागलेल्या निकालाने माझं आयुष्यच बदललं. निकालाच्या आधी आणि निकालाच्या नंतर असे माझ्या जीवनाचे दोन ठळक भाग करता येतील, इतका मोठा फरक केवळ एका निकालाने पडला होता. त्या दिवशी घरी दारू पिण्यासाठी आलेल्या ग्राहकास, “म्हना बी पोऱ्या एक दिन डॉक्टर – कलेक्टर हुई. असं आईनं दिलेलं उत्तर, तिच्याही नकळत शब्दश: खरं ठरलं होतं. मी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं होतं. स्वप्न खरी होतात. स्वप्न पाहण्याची हिंमत केली, तरच ती साकारता येतात. ती पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. अगदी कोणीही! आपल्याला यश मिळविण्यापासून थांबविणारी एकच व्यक्ती या जगात असते, ती म्हणजे स्वतः आपणच!

मी कधीही स्वत:ल रोखलं नाही. भीती वाटली म्हणून डगमगलो नाही. शक्य नाही म्हणून थांबलो नाही. उलट प्रत्येक वेळी मी माझ्या क्षमतांना अधिकाधिक ताणण्याचाच प्रयत्न केला. स्वत:शी. प्रामाणिक राहिलो आणि जे केलं त्यात स्वत:ला १०० % झोकून दिलं. त्यानंतरजे काही मिळालं, ते तितक्याच खुल्या दिलानं मी स्वीकारलंही.

माझा देशात ७०९ वा क्रमांक असल्याने मला आयएएस (कलेक्टरची) रँक मिळू शकेल की नाही, याबद्दल माझ्या मनात शंका होती. पण इंडियन पोलीस सर्व्हिसेस (आयपीएस) किंवा इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस (आयआरएस) मधील संधी नक्कीच मिळू शकेल, याची मला खात्री होती. आणि मी त्याची मनोमन तयारीही केली होती.

दरम्यान कामानिमित्त मी मुंबईला आलो होतो. त्याचवेळी युपीएससी २०१३ साठीची पूर्वपरीक्षाही होती. अनायसे मुंबईला आलोच होतो, म्हणून मी पुन्हा एकदा पूर्वपरीक्षा दिली. इंटर्नशिपच्या अखेरीस मी या परिक्षेचा फॉर्म भरला होता. मी मिळवलेल्या यशाबद्दल माझं अजुनही कौतुक, अभिनंदन, सत्कार वगैरे सुरूच होतं. या सगळ्या धावपळीत माझं स्वत:कडे थोडं दुर्लक्षही झालं. अन्यथा फिजिकल फिटनेसबाबत मी सदैव दक्ष राहत असे.

एके दिवशी अचानक मला माझ्या छातीत गाठ झाल्याचं आढळून आलं. मी तातडीने धुळ्याला अॅडमिट झालो आणि एका छोट्या ऑपरेशननंतर ती गाठ संपूर्णपणे काढून टाकण्यात आली. आपरेशननंतर माझ्या डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळं मी घरी परतलो आणि त्यानंतर जवळपास महिनाभर विश्रांती घेतली. आयुष्यात प्रथमच कोणत्याही तणावाशिवाय निवांतपणे मी आईच्या सान्निध्यात होतो. ताई, भाऊ, वहिनी, सामोड्यातील मित्र या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आनंद मी अनुभवत होतो. मी मिळवलेल्या यशामुळे माझ्या कुटुंबाकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला होता. त्या सर्वांच्या नजरेत आईविषयी, माझ्याविषयी अपूर्व असा आदरभाव बघतांना मला खूप बरं वाटायचं.

एकाच आयुष्यात मी परिस्थितीचे दोन अतिशय विरोधी असे टोक बघत होतो. अशातच एके दिवशी माझ्या एका मित्राचा मला फोन आला. मी पुन्हा एकदा दिलेल्या युपीएससी पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर झाल्याचं त्याने मला सांगितलं. पण २-३ दिवस मी निकाल पहायला सुद्धा गेलो नाही. मला त्याविषयी फारशी उत्सुकताही वाटली नाही. कारण पुन्हा मुख्य परिक्षेची तयारी करून मुलाखतीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास करण्याची माझी इच्छा होत नव्हती.

शिवाय मला आता कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर कमावतं व्हायचं होतं. आई आणि भाऊचं ओझं कमी करायचं होतं. तिची आयुष्यभर सुरू असलेली दमछाक कुठेतरी थांबवायची होती. परंतु मी यावेळीही युपीएससी पूर्वपरीक्षा पास झाल्याचं मला कळलं. मात्र मी ते फार मनावर घेतलं नाही.

त्याच दरम्यान मला भारतीय महसूल सेवा पद (आयआरएस) मिळाल्याचंही समजलं. मी खरं तर आयएएस, आयपीएस व नंतर आयआरएस असा प्राधान्यक्रम भरला होता, पण मला आयआरएस हे पद मिळालं. माझ्यापेक्षा खालची रँक असणाऱ्या काहींना मात्र आयपीएस मिळालं, म्हणून मी दिल्लीला मिनीस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्समध्ये चौकशी केली. त्यांनी, ‘काहीतरी चूक झाली असेल, पुन्हा कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी या’, असं सांगितलं.

मी नंतर विचार केला की, शासनाच्या अनावधानाने का होईना आपल्याला आयपीएसच्या ऐवजी चुकून आयआरएसचं पद मिळालं, हा भगवंताचाच संदेश…i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-61

क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)

https://bit.ly/bspmycityshrigonda

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading