शेवटचा भाग … मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ. राजेंद्र भारुड (IAS) भाग ६४.

मजल दरमजल करत मी फरिदाबादला पोहोचलो. इथल्या ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ कस्टम एक्साईज अॅण्ड नार्कोटिक्स’ या अकादमीत आम्हाला भारतीय महसूल सेवेचं प्रशिक्षण दिलं जाणार होतं. NACEN चा परिसर अतिशय प्रशस्त आणि भव्य होता. सोयीसुविधांचं तर वर्णन करावं तेवढं कमीच. स्वच्छ आणि ऐसपैस मेस, वातानुकुलीत व्यायामशाळा, भलंमोठं ग्रंथालय, अगदी सर्वच प्रकारचे खेळ, शिवाय राहण्याची व्यवस्थाही अतिशय उच्च दर्जाची होती. ही सर्व सुखव्यवस्था पाहून माझा स्वत:वर विश्वास बसत नव्हता. सर्वच इमारती स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनेही उत्कृष्ट होत्या. डोळे दिपवणाऱ्या सभागृहात सर्व कर्मचारी आम्हाला उच्च अधिकाऱ्यासारखीच वागणूक देत असत. संपूर्ण वातावरण एक कणखर अधिकारी घडविण्यास पूरक असेच होते.

मधल्या काळात तीन आठवड्यांसाठी आम्हाला हैद्राबादला पोलिस ट्रेनिंगसाठी पाठविण्यात आलं. त्यामध्ये आम्हाला एके -४७, सीएमजी, मशीनगन, पिस्तुल अशी विविध प्रकारची शस्त्रे स्वत: हाताळायला मिळाली. ते चालवण्याचं शिक्षणही देण्यात आलं. हैद्राबादला जातांना मी आयुष्यात पहिल्यांदा विमानाने प्रवास केला आणि विशेष म्हणजे आजवर केवळ चित्रपटांमधून पाहिलेल्या ‘फाईव्हस्टार’ हॉटेलमध्ये आमचा मुक्काम असायचा. तिथल्या आलिशान बेडवर मला माझे बालपणाचे सामोड्याचे दिवस आठवत. प्रशिक्षणादरम्यान खास आमच्यासाठी महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माननीय पंतप्रधान मनमोहनसिंग, अर्थमंत्री पी. चिदंबरम् व अन्य बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तीची व्याख्याने आयोजित केली गेली. विविध क्षेत्रात देशाचं नेतृत्व करणारी एवढी मोठी माणसं मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो, तेसुद्धा अगदी जवळून.

आयआरएसचं प्रशिक्षण सुरू असतांनाच माझा युपीएससी मुख्य परिक्षेचा निकाल लागला. मी अपेक्षेप्रमाणे सलग दुसऱ्यांदा मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखतीसाठी पात्र झालो होतो. एव्हाना माझा पगारही सुरू झाला होता शिवाय फरिदाबाद पासून दिल्ली जवळच असल्याने यावेळी माझी दिल्लीवारी सहज शक्य झाली. मंडाले मावशी व गुरुजींच्या शुभेच्छा स्वीकारून मी मुलाखतीला गेलो. यावेळी सुद्धा मुलाखत अतिशय चांगली झाली. The last part… I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS) Part 64.

आयआरएसचे प्रशिक्षण सुरू होते. आता मी पुन्हा एकदा निकालाची वाट बघत होतो. मागच्यापेक्षा यावेळी बराच तणाव मूक्त होतो. मे महिन्यात निकाल लागला. प्रामाणिक प्रयत्न केल्यास हवं ते मिळवता येतं, हे पुन्हाएकदा सिद्ध झालं. भारतात ५२७ वी रँक आली. काही दिवसात प्रवर्गानुसारही निकाल जाहीर झाले. एस.टी. प्रवर्गात मी भारतात ८ वा आलो होतो.

https://bit.ly/bspmycityshrigonda

माझं आयएएस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मावशी, गुरुजी, सर्व मित्रपरिवार, शिक्षकवृंद सर्वांना हा नवा निकाल कळवला. पायाखालची काटेरी वाट जमेल तशी तुडवत मी पाहिलेलं स्वप्न साकार झालं. इंदिरानगरातील झोपडीमधून आयएएस पदापर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. शेवटी भिल्लाचं पोर कलेक्टर झालं…

स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)

आज या पुस्तकाचा शेवटचा भाग प्रकाशित करण्यात आला. वाचकांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading