या प्रशिक्षणात केवळ प्रशासकीय बाबींचाच समावेश असतो, असे नाही. नृत्य, नाट्य, साहित्य, विविध कला, क्रीडा या कौशल्यांनाही वाव दिल्या जातो. त्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. अधिकाऱ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास व्हावा, ही भावना आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, रिव्हर रॉफ्टिंग, बंजी जंपिंग या साहसी क्रीडा प्रकारांना सुद्धा प्रशिक्षणकाळात खूप महत्त्व दिलं जातं. यामुळे शरीर, मन व बुद्धी बळकट व्हायला मदत होते. पदभ्रमंती हादेखील महत्त्वाचा टप्पा प्रशिक्षणात असतो. हिमालयाच्या पर्वतरांगांत डोडिताल ते यमुनोत्री या मार्गावर दररोज सुमारे २५-३० कि.मी. याप्रमाणे मोबाईल फोन, टॉर्च यांशिवाय सतत ८ दिवस पायी चालायचे असते. निसर्ग आणि केवळ निसर्गाचे सान्निध्य. हा अनुभव मन कणखर आणि शरीर लवचिक करणारा ठरला.

या प्रशिक्षणातला खूपच आनंददायी आणि अभूतपूर्व टप्पा म्हणजे भारतदर्शन. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना भारताच्या विविध भागात, विभिन्न भौगोलिक परिस्थितीत २ महिने राहावे लागते. त्यास आर्मी अटॅचमेंट असं म्हणतात. यामध्ये आमची आर्मी अटॅचमेंट सिक्कीम येथे झाली होती. आम्हाला जलपायी, गुडी, सिक्कीम, गंगटोक याशिवाय आर्मीच्या विविध कॅम्पस् मध्ये राहता आले. आमचि लोक कशापद्धतीने प्रतिकुल परिस्थितीत राहतात, त्यांना कोणत्या समस्या व आव्हानं असतात, त्यांचं जीवन कसं असतं, हे जवळून पाहता आलं. हा सबंध अनुभवच थरारक होता. रक्त गोठवणारी कडाक्याची थंडी, कोणत्याही क्षणी शत्रूच्या आक्रमणाचे भय, तरीही विजयाची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि निस्सिम देशप्रेमाचा आविष्कार आम्हाला आर्मी जवानांसोबत अनुभवता आला. I had a dream! Dr. Rajendra Bharud (IAS), Part 63.
या अनुभवाने देशाच्या संरक्षणासाठी प्राण तळहातावर घेऊन सिमेवर उभ्या असलेल्या भारतीय सैन्यातील प्रत्येक जवानाविषयीचा आदर वृद्धिंगत झाला. ते तिथे आहेत म्हणूनच आपण निश्चिंत आहोत याची जाणीव झाली. त्याकाळात देशभावनेने तर मी आणखीनच भारावून गेलो. मनोमन भारतीय सैन्याला कडक सॅल्युट ठोकला.
त्यानंतर अंदमान, निकोबार, मिझोराम, मेघालय, दक्षिण भारतातील विविध राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी प्रशिक्षणांतर्गत आम्हाला उत्तुंग हिमशिखरे ते रमणीय समुद्रकिनारे, मेघालयातील आदिम संस्कृती ते मुंबई, न्यू दिल्ली, चेन्नई येथील अत्याधुनिक संस्कृती पाहता आल्या. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्ध करणारा समृद्ध अनुभव मसुरी प्रशिक्षणाने दिला.
या प्रशिक्षणातील सर्वोच्च अनुभव होता, तो महामहीम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या प्रत्यक्ष भेटीचा. केवळ भेटीचाच नव्हे; तर त्यांच्यासमवेत स्नेहीभोजन व वार्तालाप करण्याचा. लोकसभा व राज्यसभा अधिवेशनातील कामकाज पाहण्याची संधी देशाकडे बघण्याचा नवाच दृष्टिकोन देणारी ठरली. भारताच्या विविधतेचा, संपन्नतेचा आणि या विविधतेतील एकतेचा अद्भुत अनुभव मसुरी प्रशिक्षणाने दिला.
माझ्यासारख्या अतिशय गरीब कुटुंबातील, खेड्यातील थोड्याशा लाजाळू व्यक्तीमधील नेतृत्वगुण व अनेक सुप्त गुण बाहेर येण्यास या प्रशिक्षणाने खूप मदत झाली. मात्र पहिल्या वेळेस आयआरएस साठी माझी निवड झाल्यानंतर मी ३ महिन्यांची रजा काढून मुंबईतील SIAC या सरकारी संस्थेत प्रवेश घेतला.
आता मला पुन्हा एकदा जोमाने यूपीएससीची परीक्षा द्यायची होती. पूर्वपरीक्षा तर मी पास झालोच होतो, आता मला मुख्य परिक्षेची तयारी करायची होती. माझी ७०९ रॅक येण्याचं कारण मुख्य परिक्षेत मिळालेले कमी गुण हे होतं. मला मुलाखतीसाठी अतिशय चांगले म्हणजे 300 पैकी २१० गुण मिळाले होते. तसेच “मेडिकल सायन्स’ या विषयात तर मी देशभरात सर्वप्रथम होतो. “सामान्य अध्ययन आणि निबंधमध्येही बऱ्यापैकी गुण होते. फक्त पॉलिटीकल सायन्स या दुसऱ्या ऐच्छिक विषयात मला 600 पैकी फक्त २१० गुण मिळाल्याने माझा एकूणच स्कोअर घसरला होता.
माझी SIAC च्या हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था झाली. तिथे दरमहा १५०० रुपये विद्यावेतनसुद्धा मिळत असे. ते मला इतर खर्चाला पूरत असत. तसेच नीलेशने दिलेल्या पैशातून मी पुस्तक आणि जेवणाचा खर्च भागवत होतो. यावेळी ‘पॉलिटिकल सायन्स’ची उणीव भरून काढायचं मी ठरवलं होतं. जेणेकरून एकूण गुण वाढून वरचा रँक मिळू शकेल आणि आयएएसचं पद मिळेल.
मी पुढचे ३ महिने पुन्हा एकदा जोमाने अभ्यास केला. ‘पॉलिटिकल सायन्स’चा पेपर मागच्या वेळेपेक्षा चांगला गेला. तसेच उर्वरित पेपरही मागच्या वेळेप्रमाणेच उत्तम गेले. परीक्षा देऊन मी घरी परतलो. मला आता आयआरएस चं मुख्य प्रशिक्षण घेण्यासाठी दिल्लीजवळ फरिदाबादला जायचं होतं.
क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)
