असेल. जे होतं ते भल्यासाठीच होतं. त्यातच छातीच्या शस्त्रक्रियेमुळे माझ्या शारीरिक हालचालीवर काही प्रमाणात मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे आयपीएसच्या प्रशिक्षणात आपल्याला अडचणी येतील, असं मला वाटतं होतं. पुन्हा एकदा युपीएससी ट्राय करायला काय हरकत आहे, असा विचार माझ्या मनात आला. त्यामुळे मी आयआरएस स्वीकारण्याचं ठरवलं.
त्याचवेळी मला नेहमी प्रोत्साहन देणारा माझा मित्र निलेश पाटील मला भेटायला आला. मी त्याच्याशी चर्चा केली, तेव्हा “सध्या ‘आयआरएसचं पद घे, जेणेकरून तुला पुन्हा युपीएससीच्या तयारीला जास्त वेळ मिळेल. ”असं म्हणून त्यानेही माझ्या दुसऱ्यांदा परीक्षा देण्याच्या निर्णयाला दुजोराच दिला होता. शेवटी मी आयआरएस हेच पद स्वीकारलं. सुरवातीला मसुरी येथे ३ महिन्यांचा फाऊंडेशन कोर्स असतो, मी त्या फाउंडेशन कोर्सला न जाण्याचं ठरवलं.
मात्र माझ्या अभ्यासाचं व कष्टाचं फळ म्हणून मला दुसऱ्या वर्षी पुन्हा मसुरीच्या प्रशिक्षणाची संधी मिळाली. मसुरी म्हणजे ‘पहाडों की रानी’. क्वीन ऑफ हिल स्टेशन्स’. स्वप्नवत सुंदर असलेल्या अशा नितांतसुंदर पर्यटनस्थळी मला कधी जाता येईल, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.

उत्तराखंडची राजधानी देहरादून पासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर, समुद्र सपाटीपासून 8000 फूट उंच असलेलं व हिमालयाच्या शिखरांनी वेढलेलं मसुरी हे थंड हवेचं ठिकाण. इथलं वातावरण अतिशय आल्हाददायक. मसुरीला पहाडों की रानी’ का म्हणतात, हे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. अशा स्वर्गीय सुंदर मसुरीत आमचा मुक्काम जवळजवळ एक वर्ष होता. मसुरी जसं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं, तसंच ते ब्रिटीशकाळापासून देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेचं प्रशिक्षण केंद्र म्हणूनही अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून निवड झालेले आयएएस अधिकारी येथल्या लालबहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी ( LBSNAA ) मध्ये भेटतात. प्रत्येकात असलेले वेगवेगळे गुण, विभिन्न कौशल्ये अनुभवताना आपण स्तीमित होतो. प्रशिक्षणाची सुरूवात फाऊंडेशन कोर्सने होते. या कोर्सअंतर्गत आयएएस, आयपीएस, आयएफएस व आयआरएस अशा प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. अकादमीचा परिसर अतिशय भव्यदिव्य, रमणीय व आल्हाददायक आहे. निसर्गाच्या कुशीत अत्यंत उत्साही वातावरणात येथे प्रशिक्षण दिले जाते. येथील प्रशिक्षण कक्ष, सभागृह, ग्रंथालय, संगणक कक्ष, निवास कक्ष, मेस हे सर्वच खूप प्रशस्त आहेत. फूटबॉल, टेनिस, व्हॉलिबॉल, हॉर्सरायडिंग, बॅटमिंटन, इत्यादी खेळांची मैदाने तसेच जिम्नॅशियम अतिशय प्रशस्त व आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. मानसिक व शारीरिक फिटनेससाठी प्राधान्य दिले जात असल्याने हे प्रशिक्षण निवड झालेल्या सर्वच अधिकाऱ्यांसाठी सक्तीचे असते.
अगदी भल्या पहाटे ५ वाजता कडाक्याच्या थंडीतच आम्हाला उठावे लागे. होस्टेलपासून साधारणत: २ कि.मी. अंतरावर असलेल्या पोलो ग्राँडवर मॉर्निंग पी.टी. होत असे. पोलो ग्राँडकडे जाणारा रस्ता उताराचा. त्यामुळे जाताना आम्ही सहज व लवकर जात असू. पी.टी.च्या थकव्यामुळे मात्र परतताना चढण असल्याने प्रचंड दमछाक होई. तेथील पी.टी. ट्रेनरही खूप शिस्तप्रिय. आपल्यासमोर आयएएस किंवा आयपीएस अधिकारी आहेत हे मनातही न आणता कडक शिस्तित पण आदराने पी.टी. करवून घेत. या प्रशिक्षणाचा आपल्या मनावर, संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर; नव्हे तर समग्र आयुष्यावरच खूप परिणाम होतो. मसुरीला भरपूर पाऊस पडतो. हिवाळ्यात तर नेहमीच बर्फ पडतो. या ‘पहाडों की रानी च्या कोणीही प्रेमात पडावं, असंच हे हॉलिडे डेस्टिनेशन आहे. पण आपण केवळ पर्यटन स्थळीच नाही, तर प्रशिक्षण केंद्रातही आहोत, याची मनोमन जाणीव सातत्याने होत राहावी, इतकी येथे शिस्त असते. त्यातून कोणाचीही सूटका होत नाही. त्यामुळे प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आम्ही खूप गांभिर्याने घेत असू. i-had-a-dream-dr-rajendra-bharud-ias-part-62
भारतीय संविधान, विविध कायदे, वेगवेगळ्या प्रशासकीय बाबी कशा हाळाव्यात याचे प्रशिक्षण देण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी, व्यासंगी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळत असे. तसेच देशातील मान्यवर जसे की, महामहीम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, उत्तराखंडचे राज्यपाल, विविध खात्यांचे मंत्री आदींच्या व्याख्यानांचे आयोजन होत असे. जागतिक पातळीवरील प्रख्यात विषयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचाही लाभ आम्हाला मसुरीच्या प्रशिक्षणात मिळाल. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना भारताच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेतील सर्व बारकावे, सर्व कायदे, प्रशासकीय यंत्रणा व व्यवस्था यांचे सखोल ज्ञान व्हावे, हा उद्देश या प्रशिक्षणामागे आहे…
क्रमशः
स्रोत:(मी एक स्वप्न पाहिलं.! डॉ.राजेंद्र भारुड,IAS यांच्या पुस्तकातून)
