दिनांक २० जुलै २०२४, श्रीगोंदा:
महाराष्ट्र शासनाने नुकतीच महिला भगिनींकरिता “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना जाहीर केली असून, श्रीगोंदा तालुका आणि विशेषतः नागवडे यांच्या टीमने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत चांगले काम केले आहे. शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, २२ जुलै २०२४ रोजी दुपारी १:०० वाजता सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नागवडे कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे आणि जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी ही माहिती दिली. प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते असल्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पात अनेक समाज उपयोगी योजना जाहीर केल्या आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना लोकप्रिय ठरली असून, तिची अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यात अतिशय चांगल्या प्रकारे झाली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह आमदार संग्राम जगताप, राज्य मार्केट कमिटीचे अध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना महिलांसाठी असून, या योजनेसंदर्भात अजित पवार महिलांशी संवाद साधणार असल्यामुळे काही महिलांना अजित पवारांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला भगिनींची उपस्थिती महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच दिवशी अजित पवारांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचे अभिष्टचिंतन आणि सत्कारही करण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र दादा नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे आणि संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






