दिनांक २० जुलै २०२४,श्रीगोंदा:
अग्नीपंख फौंडेशनने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात श्रीगोंदा ते पंढरपूर १७५ किमीची सायकल वारी करणारे दौड/श्रीगोंदा/राशीन येथील सायकल वारकरी व सीए, पोलिस कॉन्स्टेबल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आंब्याचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान कर्जतचे पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, उद्योजक विठ्ठलराव जगदाळे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दररोज पाच किमीची पायपीट करुन दहावीत ९८ टक्के गुण मिळविणारी अनुष्का थोरात (येळपणे) व आई-वडीलांचे छत्र हरपलेली अनुजा सोनवणे (लोणीव्यंकनाथ) यांना शिक्षणासाठी मदत देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य शिवदुर्गचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. तसेच, निंबळक सायकल स्व. कानीफनाथ कोतकर यांच्या कुटुंबासाठी मदत शिवशंभुच्या अध्यक्ष विजया लंके यांचेकडे देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक सुभाष धुमाळ होते.
पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे म्हणाले की, अग्नीपंख फौंडेशनने सत्कार मुर्तींना आंब्याचे रोप दिले आहे. यांचे संगोपन उत्कृष्ट व्हावे आणि हा कार्यक्रम स्मृतीत राहावा असे त्यांनी सांगितले. सुभाष धुमाळ म्हणाले की, अग्नीपंख फौंडेशनने सायकलपटूंचा सन्मान करताना विद्यार्थ्यांना मदतीचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यातून समाजात परिवर्तन होते.
यावेळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, श्रीगोंदा सायकल असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ दरेकर, भाऊसाहेब वाघ, ज्ञानेश्वर खेतमाळीस, अॅड कावेरी गुरसल, गोपाळ डांगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रशांत दरेकर यांनी केले तर आभार मिठू लंके यांनी मानले. विशाल चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आशाबाईंचे आनंदाश्रू:
लग्न झाल्यानंतर बारावीची परीक्षा दिली, दोन मुलं झाली. घरची परिस्थिती खूप नाजूक होती. माझे पती माझ्या मागे उभे राहिले आणि मी पोलिस नोकरीतून भाकरीचा चंद्र शोधण्याचे ठरविले. मुलं झोपीत असताना मी मैदानावर असायची. वयोमर्यादेनुसार शेवटची संधी होती आणि मिरा भाईंदर पोलिस कॉन्स्टेबल पदाच्या लिस्टमध्ये माझे नाव आले तेव्हा आनंद झाला. हे सांगताना आशाबाई मेहेत्रे यांच्या डोळ्यात पाणी आले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






