श्रीगोंद्यात पत्रकाराला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; पारधी वस्तीवर बॉम्ब टाकण्याचाही दिला दम..

दिनांक ३० मार्च २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरात सध्या सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, एका नामांकित न्यूज पोर्टलच्या पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

“पारधी समाजाची बाजू मांडू नको, अन्यथा गोळ्या घालून ठार करू,” अशा शब्दांत एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने पत्रकाराला धमकावले आहे. इतकेच नव्हे, तर पारधी समाजाच्या वस्तीवर बॉम्ब टाकून त्यांना संपवून टाकण्याची चिथावणीखोर भाषाही या इसमाने वापरल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

अधिकृत माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील एका हॉटेलमध्ये आज सकाळी संबंधित पत्रकार आणि जमिनी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारा एक कथित सामाजिक कार्यकर्ता आमनेसामने आले होते. यावेळी त्या इसमाने पत्रकाराला उद्देशून अत्यंत आक्रमक आणि धमकीवजा भाषा वापरली.

तो म्हणाला की, “श्रीगोंदा शहरात सध्या पारधी समाज आणि उर्वरित गाव असे दोन गट पडले आहेत. तू पत्रकारितेच्या माध्यमातून पारधी समाजाची बाजू लावून धरू नकोस. संपूर्ण गाव एका बाजूला असताना तू त्यांच्या कायदेशीर लढ्याला पाठबळ दिले तर तुला गोळ्या घालून ठार केले जाईल.”

धमकी देणाऱ्या इसमाने केवळ पत्रकारालाच लक्ष्य केले नाही, तर पारधी समाजाबद्दलही अत्यंत स्फोटक वक्तव्ये केली. “ज्या ठिकाणी पारधी समाजाचे लोक राहतात, त्या अभ्यासिकेवर बॉम्ब टाकून त्यांना कायमचे संपवून टाकू,” असा दम त्याने भरला.

धक्कादायक बाब म्हणजे, या इसमाने भूतकाळातील घटनांचा संदर्भ देत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २००१ साली महार समाजाने असाच ‘उच्छाद’ मांडला होता, तेव्हा गावाने एकी करून त्यांची ‘दादागिरी’ मोडीत काढली होती, असा दावा करत त्याने आता पारधी समाजालाही त्याच पद्धतीने लक्ष्य करण्याची धमकी दिली. “आता पारधी समाज हवेत उडत आहे, त्यांनाही धडा शिकवला जाईल,” असे प्रक्षोभक विधान त्याने केले. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर अशा प्रकारे दबाव टाकणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे, हे गंभीर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

या घटनेची गांभीर्याने दखल घेत, एका शिष्टमंडळाने पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) प्रवीण कुमार लोखंडे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने घडलेल्या सर्व प्रकाराची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली. पारधी समाजाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या नावाखाली अशा प्रकारे गुंडगिरी आणि हिंसक भाषेचा वापर करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी प्रवीण कुमार लोखंडे यांनी शिष्ट मंडळाचे म्हणणे ऐकून घेतले असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. “कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, आणि पत्रकारांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही,” असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाने केलेल्या चौकशीनंतर त्या कथीत सामाजिक कार्यकर्त्याने पोलीस प्रशासनाला बचावात्मक भूमिका मांडल्याचे समजते आहे. या प्रकरणी सामाजिक पदाधिकारी आणि चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ठरवले जाईल असे त्या पत्रकाराने माध्यमांना सांगितले आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading