दिनांक २२ जून २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात आज आठवडे बाजाराच्या गर्दीच्या दिवशी पोलिसांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींची तोंड झाकून आणि त्यांना दोरीने बांधून जाहीर धिंड काढली. पोलिसांच्या या कृत्याची शहरात मोठी चर्चा झाली असून, कायदा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आज बाजाराचा दिवस असल्याने शहरात प्रचंड गर्दी होती. अशा गजबजलेल्या ठिकाणी पोलिसांनी आरोपींना रस्त्यावरून पायी फिरवले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोणत्याही आरोपीची अशी सार्वजनिक ठिकाणी धिंड काढणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. गुन्हा कितीही गंभीर असला, तरी न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलिसांना असे करण्याचा कोणताही अधिकार नाही.
या घटनेनंतर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जर या आरोपींचे गुन्हे सिद्ध झाले असतील, तर माननीय न्यायालयाने पोलिसांना अशी धिंड काढण्याचे आदेश दिले होते का? कारण जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही, तोपर्यंत व्यक्तीला गुन्हेगार म्हणता येत नाही.

पोलीस प्रशासनाने स्वतःच कायदा हातात घेतल्यासारखा हा प्रकार असून, या बेकायदेशीर कृत्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)










Leave a Reply