दिनांक ६ नोव्हेंबर २०२५, अहिल्यानगर:
🐅 वाघ व बिबट्या प्रवण क्षेत्रात सावधगिरीने वागा — वन विभागाच्या सूचना
🐅 वाघ किंवा बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नका, मागे फिरा व त्याचा कधीही पाठलाग करू नका.

🐅 अंधाराच्या वेळी मुलांना एकटे सोडू नका. रात्री एकटे फिरताना, शौचाला जाताना किंवा शेतात पाणी भरण्यास जाताना मोठ्याने गाणी म्हणा किंवा मोबाईलवर गाणी मोठ्या आवाजात वाजवा.
🐅 रात्री शेतात जाताना सोबत कंदील, बॅटरी, दणकट काठी ठेवा. शिट्टी ठेवा व ठराविक अंतराने वाजवत राहा.
🐅 वाघ किंवा बिबट्याने केलेल्या शिकारीच्या जवळ जाऊ नका. तो लपून बसलेला असू शकतो.

🐅 पाळीव जनावरे, कुत्रे व डुकरे वाघ व बिबट्याला वस्तीकडे आकर्षित करतात. त्यामुळे जनावरे बंदिस्त गोठ्यात ठेवा व गोठ्यात प्रखर उजेडाचा दिवा लावा.
🐅 रानडुकरे, हरणे, ससे हेही बिबट्याचे खाद्य आहेत. त्यांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण करा.
🐅 शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी एकट्याने न जाता समूहाने प्रवास करावा.
🐅 सायंकाळनंतर निर्जन स्थळी जाऊन थांबू नये. शेतात वाकून काम करताना शक्य तेवढी सावधगिरी बाळगा.
🐅 वाकून काम करताना बिबट्या भक्ष समजून हल्ला करू शकतो, त्यामुळे गळ्याभोवती जाड स्कार्फ किंवा कापड बांधावे.
🐅 सायंकाळनंतर शिकारी प्राणी बाहेर पडतात. लहान मुलांना या वेळेस घराबाहेर सोडू नका.
🐅 घराच्या बाहेर दिवे लावून ठेवा. लाईट वारंवार जात असल्यास सोलर किंवा बॅटरी दिव्याची सोय ठेवा.
🐅 गुरे चरायला जाताना समूहाने जा. सायंकाळनंतर एकटे जाऊ नका. जवळ टॉर्च ठेवा व मोबाईल/रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी वाजवा.
🐅 हातात घुंगरू असलेली काठी वापरा. बिबट्या अचानक समोर आल्यास शांत उभे राहा. त्यास डिवचू नका, पाठलाग करू नका.
🐅 बिबट्याबाबत अफवा किंवा गैरसमज सोशल मीडियावर पसरवू नका.
🐅 उघड्यावर झोपणे किंवा शौचास जाणे टाळा.

🐅 घराजवळ कचरा साचवू नका. कचरा खाण्यासाठी येणाऱ्या कुत्र्या-डुकरांमागे बिबट्या येऊ शकतो.
🐅 घराजवळ दाट झाडे-झुडपे ठेवू नका, त्यात बिबट्या लपून बसू शकतो.
🐅 रात्री घराजवळ बिबट्या दिसल्यास फटाके वाजवून त्याला पळवून लावा.
🐅 उसाचे शेत हे बिबट्याचे आसरे असते. कापणी करताना सावधगिरी बाळगा. पिल्ले सापडल्यास हाताळू नका — जवळ मादी असू शकते.

🐅 गाव स्वच्छ ठेवा. त्यामुळे मोकाट कुत्री व डुकरांची संख्या कमी होईल.
🐅 तरस व बिबट्याचा फरक ओळखा:
तरस राखाडी रंगाचा असून अंगावर काळे-पांढरे पट्टे असतात; तर बिबट्या पिवळसर रंगाचा व अंगावर काळे ठिपके असतात.

🐅 आपल्या परिसरात पट्टेरी वाघ नाही. येथे बिबट्या, कोल्हा, लांडगा व तरस हेच हिंस्र प्राणी आहेत.
🐅 थोडीशी काळजी घेतल्यास बिबट्याशी संघर्ष टाळता येईल.
वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती आहे.
📞 बिबट्या दिसल्यास किंवा हल्ला झाल्यास त्वरित जवळच्या वन कार्यालयास कळवा.
वन विभाग टोल-फ्री क्रमांक: 1926
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी)
