दिनांक ८ नोव्हेंबर २०२५,अहिल्यानगर:
शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीचा आणि दुकानावर तोडफोड केल्याचा बदला घेण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचे नगर तालुका पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून, त्याच्या पत्नीसह इतर नातेवाईकांविरोधातही पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील चार विरोधकांना (गणेश काकडे, माऊली पठारे, सुनील पठारे, अक्षय भंडारे) अडकवण्यासाठी हा बनाव रचण्यात आला होता.

दिनांक २५ ऑक्टोबर रोजी हातवळण (ता. अहिल्यानगर) येथे शेतजमिनीच्या वादातून तुकाराम महादेव यादव याला मारहाण करून त्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली होती.
या घटनेनंतर तुकाराम यादव यांच्या पत्नीने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, मारहाण करून जीवे ठार मारण्यासाठी पती तुकारामचे अपहरण झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील चार जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता, तांत्रिक विश्लेषणात तुकाराम यादव हा फोनद्वारे पत्नीच्या संपर्कात असल्याचे समोर आले.
संशय आल्याने पोलिसांनी तुकारामच्या नातेवाईकांवर नजर ठेवली. हे नातेवाईक रात्रीच्या वेळी शेंडी परिसरात जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पाठलाग केला असता, तुकाराम यादव हा शेंडी येथील एकाच्या शेतात लपून बसला होता आणि हे नातेवाईक त्याला भेटायला जात असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत तुकारामला ताब्यात घेतले. त्याने विरोधकांना अडकविण्यासाठी अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली.
या कटात तुकाराम यादवला त्याची पत्नी व नातेवाईकांनी मदत केली होती. पत्नीने पतीचे अपहरण झाल्याची खोटी फिर्याद दिली होती. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम यादवसह त्याच्या पत्नी व इतर नातेवाईकांविरोधात पोलिसांची दिशाभूल करत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
