“फुले” चित्रपट ५ मेपासून (काष्टी) श्रीगोंदा येथे — प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, सामाजिक कार्यकर्त्यांची समाधानाची भावना..

श्रीगोंदा, ४ मे २०२५:

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित “फुले” हा बहुप्रतिक्षित चित्रपट अखेर श्रीगोंदा शहरातील प्रेक्षकांसाठी सोमवार दिनांक ५ मे २०२५ रोजी दुपारी ३:०० पासून SR CINEMA, काष्टी येथे प्रदर्शित होणार आहे. याबाबत चित्रपटगृहाचे मालक राकेश पाचपुते यांनी माहिती दिली. बुक माय शो या ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे बुकिंगही सुरू होणार असून मंगळवार दिनांक ६ मे रोजीचा संपूर्ण शो आधीच बुक झाल्याचे त्यांनी सांगितले.

“फुले” चित्रपट मूळ जयंती दिवशी, म्हणजे ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होण्याची योजना होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला आणि अखेर २५ एप्रिल रोजी देशभर प्रदर्शित करण्यात आला. परंतु श्रीगोंदा व परिसरातील चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित न झाल्याने फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणी मानणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

या चित्रपटाचा दीड मिनिटाचा ट्रेलर काही प्रेक्षकांना खटकला होता, आणि त्यामुळे काही ठिकाणी त्यावर आक्षेप घेण्यात आले. परिणामी, चित्रपट मूळ तारखेला प्रदर्शन होऊ शकले नाही. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरसुद्धा तो श्रीगोंदा व आसपास चित्रपटगृहात दाखवण्यात येत नव्हता, यामुळे अस्वस्थता व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर, SR CINEMA श्रीगोंदा येथील व्यवस्थापनाने चित्रपटगृहाच्या मेंटेनन्समुळे उशीर झाल्याचे स्पष्ट केले. आता मात्र सोमवारपासून (५ मे) “फुले” चित्रपट स्थानिक प्रेक्षकांसाठी खुला होत आहे, ही आनंददायक बाब आहे.

“फुले” चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित असून, त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांचा वेध यात घेतला आहे. विशेषतः महिलांसाठी व वंचित समाजासाठी त्यांनी उभारलेले कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणारे आहे.

सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात ज्योतिबा व सावित्रीमाई यांचे योगदान अढळ असून, हा चित्रपट त्यांच्या कार्याचे प्रभावी दर्शन घडवतो. त्यामुळे शहर व तालुक्यातील समाजप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहावा, असे आवाहन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

– स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading