श्रीगोंद्यात धक्कादायक प्रकार – देवदैठण येथे एसटी वाहकाला गुंडांची मारहाण; व्हिडिओ व्हायरल..Video समाविष्ट..!

श्रीगोंदा, दि. १५ सप्टेंबर २०२५:

Viral video…

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे आज (सोमवार) दुपारी शिरूर आगाराच्या एसटी बसच्या वाहकास काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ वाहकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्याने तो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर-देवदैठण-विसापूर फाटा मार्गावर धावणारी बस देवदैठण येथे पोहोचली असता, देवदैठणकडून शिरूरकडे जाणाऱ्या एका कारवर एसटीमुळे पाणी उडाले.

या क्षुल्लक कारणावरून कारमधील दोन ते तीन तरुण संतापले. त्यांनी तात्काळ गाडी एसटीसमोर आडवी लावून बस थांबवली आणि वाहकाला जबर मारहाण केली. एवढेच नव्हे तर, “बेलवंडी पोलिसांना मीच फोन करतो, माझ्या विरोधात तक्रार दिलीस तर परिणाम भोगावे लागतील” असा दम देत शिवीगाळ करण्यात आली.

घटनेदरम्यान वाहकाने आपल्या मोबाईलमधून संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कर्तव्यावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार अशा प्रकारे छळ सहन करावा लागतो, याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, या घटनेनंतर नागरिकांकडून, गुंडगिरीला वाव देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्रोत:(व्हायरल व्हिडिओ)

Leave a Reply