श्रीगोंदा: नगरसेवकाच्या गोळीबार प्रकरणाची निवडणूक काळात पुन्हा चर्चा; कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.!

दिनांक २१ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहराच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा एका नगरसेवकाच्या गोळीबार प्रकरणाने उचल खाल्ली आहे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शांतता आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्या या घटनेची चर्चा जोर धरत आहे, ज्यामुळे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

गेल्या वर्षी मांडवगण रोडवर एका नगरसेवकाने किरकोळ वादातून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. धक्कादायक म्हणजे, स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करूनही सदर प्रकरण प्रकाशात येऊ शकले नाही आणि कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. मात्र, सध्याच्या नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत हे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

श्रीगोंदा शहराच्या विकासाच्या नावाखाली स्वतःचे हित साधणारे आणि कायदा-सुव्यवस्थेची भीती न बाळगणारे काही नगरसेवक पुन्हा एकदा पालिकेवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेत मतदारांवर दहशत निर्माण होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एका चालकाने सोशल मीडियावर केलेल्या आर्थिक व्यवहारासंबंधीच्या पोस्टला राजकीय विरोधक असलेल्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिली. यातून फोनवर झालेला वाद इतका चिघळला की, रागाच्या भरात संबंधित चालकाच्या मालकाने (जो नगरसेवक असल्याचे बोलले जात आहे) मांडवगण रस्त्यावरील आपल्या व्यवसाय स्थळाजवळ हवेत तीन राऊंड गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेला दुजोरा दिला होता, व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेमुळे, नगरसेवकाने वापरलेले शस्त्र लायसनधारी होते की विनापरवाना, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

निवडणुकीच्या काळात मतदारांना कोणत्याही प्रकारची दहशत होऊ नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading