श्रीगोंदा: ससाणे नगरच्या लहान मुलांच्या दफन भूमीत संशयास्पद उत्खनन; नागरिकांत चिंता..!

दिनांक १६ मार्च २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील साळवण देवी रोड व बस आगाराच्या मागील बाजूस असलेल्या ससाणे नगर येथील लहान मुलांच्या दफन भूमीत संशयास्पद उत्खनन झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

ससाणे नगरमध्ये मागील दोन-तीन वर्षांत कोणत्याही लहान मुलाचा मृत्यू झाला नसताना, काल एका लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दफन भूमीत मोठा खड्डा आणि ताज्या उत्खननाच्या खुणा आढळल्या. हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सामाजिक कार्यकर्ते कुणाल शिरवाळे यांनीही या घटनेची पुष्टी करत श्रीगोंदा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी भगत मॅडम यांना यासंदर्भात त्वरित माहिती दिली.

ससाणे नगर दफनभूमी ही श्रीगोंदा नगरपालिकेच्या अखत्यारीत असून तिला मजबूत दगडी कंपाउंड आहे. मात्र, येथे गेट किंवा ओळख पटवणारा कोणताही फलक नसल्याने या जागेचा गैरवापर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक नागरिकांनी हा भाग निर्जन असल्यामुळे येथे गर्भपात झालेले भ्रूण किंवा एखादा मृतदेह पुरण्यात आला नसेल ना? असा संशय व्यक्त केला आहे.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी, तसेच संशयित उत्खनन करण्यात आलेल्या ठिकाणी योग्य तपासणी व्हावी, यासाठी लवकरच पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने त्वरित पावले उचलून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise..

अशा प्रकारे उत्खनन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading