दिनांक १६ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना समाजकंटकांनी केल्याच्या निषेधार्थ बहुजन समाजाने आवाज उठवला आहे. तसेच, या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या संविधानप्रेमी आणि आंबेडकरी समाजातील लोकांवर पोलिसांकडून झालेल्या दडपशाहीचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. याच दरम्यान, पोलिस कोठडीत तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली आहे.

बहुजन समाज पार्टीच्या श्रीगोंदा विधानसभा शाखेतर्फे तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात संविधान विटंबनेप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पोलिस कोठडीत सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.

निवेदनातील मुद्दे:
१. संविधान विटंबनेप्रकरणी कठोर कारवाई करत आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
२. पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा.
३. शांततेने आंदोलन करणाऱ्या महिला, तरुण, आणि मुलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत.
४. संविधान आणि आंबेडकरी विचारांवर हल्ला करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करण्यात यावी.

पोलीस आणि प्रशासनावर आरोप:
बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की राज्यात पुन्हा पेशवाईसारखी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. दलित, आदिवासी, आणि अल्पसंख्याक समाजावर अघोषित युद्धाची परिस्थिती तयार झाली असून, त्यांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासन दडपशाही करत आहे.
तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनावेळी सुनील ओहोळ, विठ्ठल म्हस्के, नितीन जावळे, भीमराव घोडके, बलभीम घोडके, अश्रू ढवरे, सर्जेराव गायकवाड, सत्यवान शिंदे, बाळकृष्ण काकडे, नंदुभाऊ ससाणे, संतोष भोसले, आकाश सुडगे, रोहित साळवे, पृथ्वीराज बोखारे, अंबादास घोडके यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

स्रोत:(निवेदन)
