दिनांक १७ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत प्रशिक्षणार्थ्यांनी सहा महिन्यांवरून अकरा महिन्यांपर्यंत कार्यकाळ वाढविण्याची मागणी केली आहे. यासाठी तहसील कार्यालय येथील निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्यासह पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन सादर करण्यात आले.

याबाबत महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या दिनांक ९ जुलै २०२४ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत, प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मागण्यांचा ठाम आग्रह व्यक्त केला. या योजनेअंतर्गत शिक्षण, आरोग्य, महसूल, कृषी विभागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षणासाठी कामावर रुजू करण्यात आले आहे. मात्र, सहा महिन्यांच्या मर्यादेमुळे प्रशिक्षकांना आर्थिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

योजनेचा कार्यकाळ ६ महिन्यांवरून ११ महिने करावा आणि नियमित पगार मिळावा, अशी प्रमुख मागणी निवेदनात मांडली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवरचा आर्थिक ताण कमी होईल आणि बेरोजगार युवक-युवतींना स्थैर्य मिळेल, असा विश्वास लाभार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

प्रशिक्षणार्थ्यांनी श्रीगोंदे येथे बैठक घेऊन सर्वानुमते मागण्या ठरवल्या आणि संबंधित विभागाला निवेदन दिले. या बैठकीसाठी हनुमंत उदांडे, सचिन काळे, रावसाहेब मस्के, ओंकार थेऊरकर, अमोल कराळे, शिवलिंग व्यवहारे, सचिन नलगे, प्रताप येरकळ, पवन रणदिवे, विशाल साबळे, संतोष भोसले, प्रियंका खिलारे, भाग्यश्री कांडेकर, पायल कोकाटे, सोनाली शिर्के, शुभम हातवळणे आदी युवक-युवती उपस्थित होते.

याबाबत संतोष भोसले यांनी सांगितले की, “योजना उपयुक्त असली तरी कार्यकाळ मर्यादित असल्याने प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारात सातत्य राहात नाही. कार्यकाळ वाढल्यास आमच्या सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.”
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
