दिनांक १८ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बहुजन समाज पार्टी सह तालुक्यातील तमाम पुरोगामी संघटनांच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर दिनांक २० डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान पोलीस कोठडीत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.

सविस्तर असे की, या घटनेनंतर संविधान प्रेमी व आंबेडकरी समाजाने शांततापूर्ण निदर्शने सुरू केली असता, परभणी पोलिसांनी समाजातील महिलांना व तरुणांना घरी घुसून अटक केली. यावेळी अनेकांना मारहाण करण्यात आली. यातच सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच संविधान विटंबना करणाऱ्यांना कठोर शिक्षेची मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:
१. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा.
२. संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी.
३. कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित व इतर निरपराध व्यक्तींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत.
४. महिलांना व तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे.
धरणे आंदोलन श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर दुपारी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे.
हे धरणे आंदोलन श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर दुपारी ११:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत होणार आहे.

बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनिल ओहोळ, भीमराव घोडके, नितीन जावळे, सत्यवान शिंदे, अंबादास घोडके, नंदकुमार ससाणे, शिवाजी ननवरे, उत्तम शिंदे, बबन शिंदे, वंदना झराड, मंदाबाई उल्हारे, सर्जेराव गायकवाड यांच्यासह शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या पुरोगामी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत.

स्रोत:(निवेदन)
