घोडेगाव पाझर तलावातील गौरी शुगर कारखान्याचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

दिनांक २५ मार्च २०२५, अहिल्या नगर:

घोडेगाव पाझर तलावातून गौरी शुगर कारखान्याला केला जाणारा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि पत्रकार अनिल ठवाळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन सादर केले.

सध्या राज्यात तीव्र उन्हाळा सुरू असून अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोडेगाव पाझर तलाव हे गावातील नागरिकांसाठी आणि शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. मात्र, या तलावातील मोठ्या प्रमाणावर पाणी गौरी शुगर कारखान्याला पुरवले जात असल्याने स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या पाणीपुरवठ्यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यासंदर्भात बोलताना अनिल ठवाळ म्हणाले, “तलावातील पाणी हे गावकऱ्यांचे हक्काचे आहे. जर हे पाणी कारखान्यासाठी वापरले गेले, तर स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडला आहे.”

या मागणीला ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे. जर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

स्रोत:(निवेदन)

Advertise..

Leave a Reply