आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती..

दिनांक १७ ऑक्टोबर २०२५,अहिल्यानगर:

राहुरीचे माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर आज, दि. १७ रोजी बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोरच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी मुखाग्नी दिला.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, कर्डिले साहेब दिन-दलित, शोषीत, गरीब आणि कष्टकऱ्यांच्या पाठिशी नेहमीच ठामपणे उभे राहिले. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य उत्तुंग होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिले यांना जनसामान्यांशी नाळ जोडलेले आणि तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून गौरवले. ते पुढे म्हणाले की, “त्यांचा पिंड समाजकारण आणि राजकारणाचा होता आणि ते नेहमीच लोकांमध्ये वावरले.” त्यांनी कर्डिले कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली.

यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार सुरेश धस, आमदार शरद सोनवणे, आमदार राहुल कुल, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आणि तहसीलदार संजय शिंदे यांनीही अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी जंगले महाराज, आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या.

या शोकसभेला राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांनी जुलै २००२ ते जुलै २००४ या काळात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे राज्यमंत्री म्हणून, तर जुलै २००४ ते ऑक्टोबर २००४ या काळात जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप, पुनर्वसन आणि मदतकार्य या विभागांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.

२००४ मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच, त्यांनी २००७ पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि २००८-०९ तसेच मार्च २०२३ पासून चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात १९८४ ते १९९६ या काळात बु-हाणनगर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून झाली होती.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading